१० लाख वृक्षलागवडीद्वारे गिनीज वर्ल्ड रेकॉर्डसाठी सर्वांच्या सहभागाचे जिल्हाधिकारी यांचे आवाहन
जिल्हा प्रतिनिधी :-लाडलेसाब नदाफ आळणी येथील मध्यवर्ती रोपवाटिकेत रंगीत तालीम
धाराशिव,दि.६ ऑगस्ट (जिमाका) पर्यावरण संरक्षण,हवामान संतुलन आणि भावी पिढ्यांसाठी हरित वारसा निर्माण करण्याच्या उद्देशाने राबविण्यात येणाऱ्या ‘हरित धाराशिव २.०’ अभियानाअंतर्गत १४ ऑगस्ट रोजी शासकीय जमिनीवरील ३३ हेक्टर क्षेत्रात अवघ्या १२ तासांत १० लाख वृक्षांची घनवन पद्धतीने लागवड करून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड प्रस्थापित करण्याचा निर्धार जिल्हा प्रशासनाने केला आहे.या महत्त्वाकांक्षी उपक्रमात शासकीय यंत्रणा,सेवाभावी संस्था,स्वयंसेवक आणि नागरिकांचा सहभाग अत्यंत मोलाचा ठरणार असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी केले.
आळणी येथील सामाजिक वनीकरण विभागाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती रोपवाटिकेत आज (दि.६) हरित धाराशिव २.० अंतर्गत होणाऱ्या १० लाख वृक्षलागवडीच्या अनुषंगाने रंगीत तालीम आयोजित करण्यात आली.या वेळी जिल्हाधिकारी श्री.पुजार बोलत होते.कार्यक्रमास जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी प्रियंवदा म्हाडदळकर, उपजिल्हाधिकारी प्रवीण धरमकर, विभागीय वन अधिकारी (प्रा.) जी. एन.येडलावार तसेच सामाजिक वनीकरण विभागाचे विभागीय वनाधिकारी विश्वास करे यांची प्रमुख उपस्थिती होती.
जिल्हाधिकारी श्री.पुजार म्हणाले की,धाराशिव जिल्ह्याचे वनक्षेत्र तुलनेने कमी असल्याने पर्यावरणीय समतोल राखण्यासाठी वृक्षलागवड आणि त्याचे संगोपन ही काळाची गरज आहे.गतवर्षी १५ लाख वृक्षांची लागवड करून जिल्ह्याने नवा विक्रम नोंदविला. यंदा त्यापेक्षाही मोठे उद्दिष्ट ठेवत १० लाख वृक्षांची एकाच दिवशी लागवड करून गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड करण्याचा संकल्प करण्यात आला आहे.
या मोहिमेत सेवाभावी संस्था, स्वयंसेवक आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होणार असून, गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डकडून वनस्पती शास्त्रज्ञही उपस्थित राहणार आहेत. निवडणुकीप्रमाणे काटेकोर नियोजन या मोहिमेसाठी आवश्यक असून, वृक्षलागवडीबरोबरच त्यांच्या संगोपनाची जबाबदारीही सर्वांनी स्वीकारली पाहिजे,असे त्यांनी सांगितले.
मागील वर्षी लावलेल्या झाडांपैकी ८६ टक्के झाडे आजही जिवंत असल्याचा उल्लेख करत त्यांनी सर्व विभागांच्या परिश्रमांचे कौतुक केले.यंदाच्या मोहिमेसाठी जिल्ह्यातील ४० शासकीय रोपवाटिकांमध्ये आवश्यक रोपे तयार करण्यात आली असून, राज्य शासनाच्या ३०० कोटी वृक्षलागवड अभियानात धाराशिवचा महत्त्वपूर्ण सहभाग राहणार असल्याचे त्यांनी नमूद केले.पर्यावरण संरक्षणाच्या सकारात्मक भूमिकेतून या अभियानाला लोकचळवळीचे स्वरूप देण्यासाठी प्रत्येकाने सहभागी व्हावे,असे आवाहनही त्यांनी केले.
मुख्य कार्यकारी अधिकारी प्रियंवदा म्हाडदळकर म्हणाल्या की,यंदाच्या १० लाख वृक्षलागवडीद्वारे नवा विक्रम करण्याचे मोठे आव्हान जिल्ह्याने स्वीकारले आहे.१४ ऑगस्ट रोजी हे अभियान यशस्वी करून सर्वांच्या सहभागातून हा विक्रम प्रस्थापित करण्यासाठी प्रत्येकाने जबाबदारीने काम करावे.
उपजिल्हाधिकारी प्रवीण धरमकर यांनी सांगितले की,ही वृक्षलागवड मोहीम सामाजिक वनीकरण विभाग,वन विभाग आणि येडशी अभयारण्याच्या क्षेत्रातील जमिनीवर राबविण्यात येणार आहे.ज्या ठिकाणी वृक्षलागवड होणार आहे तेथे रेषा स्पष्ट दिसाव्यात यासाठी चुन्याचा अधिक वापर करण्यात यावा.दहा आर क्षेत्रासाठी सुमारे १५० किलो चुन्याचा वापर करून रेषांकन करावे.या मोहिमेत क्यूआर कोड मोबाईलद्वारे स्कॅन करून नोंदी करण्यात येणार असून,८ ऑगस्ट रोजी वनस्पती शास्त्रज्ञांची बैठक आयोजित करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.यावेळी विभागीय वन अधिकारी (प्रा.) जी.एन.येडलावार यांनीही मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रियंवदा म्हाडदळकर, उपजिल्हाधिकारी प्रवीण धरमकर आणि वन विभागाचे विभागीय अधिकारी जी.एन.येडलावार यांच्या हस्ते वृक्षलागवड करण्यात आली.
या प्रात्यक्षिक कार्यक्रमास उपविभागीय अधिकारी ओंकार देशमुख,गणेश शिंदे,तहसीलदार मृणाल जाधव,अरविंद बोलंगे, प्रकाश म्हेत्रे,सर्व वनपरिक्षेत्र अधिकारी तसेच विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी व सेवाभावी संस्थांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.








