महिलांबाबत आक्षेपार्ह वक्तव्याच्या निषेधार्थ मुक्ताईनगरमध्ये सर्वपक्षीय जनआक्रोश मोर्चा; कठोर कारवाईची मागणी
उपसंपादक | प्रणित काठोके
सार्वजनिक जीवनातील महिला नेत्यांविषयी सोशल मीडियावर कथितरीत्या करण्यात आलेल्या आक्षेपार्ह व अश्लील वक्तव्याच्या निषेधार्थ मुक्ताईनगरमध्ये बुधवारी सर्वपक्षीय व सर्वसमाजाच्या वतीने भव्य जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. या मोर्चामध्ये विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, महिला, युवक आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवत संबंधित आरोपीवर तातडीने कठोर कारवाई करण्याची मागणी केली.
माजी मंत्री तथा आमदार एकनाथराव खडसे, केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री रक्षाताई खडसे, राज्याच्या मंत्री पंकजाताई मुंडे, माजी खासदार डॉ. हिनाताई गावित आणि ॲड. रोहिणीताई खडसे यांच्याविषयी कथितरीत्या आक्षेपार्ह टिप्पणी करणाऱ्या विजय चौधरी याच्या विरोधात हा मोर्चा आयोजित करण्यात आला होता.
प्रवर्तन चौकातून सुरू झालेला मोर्चा तहसील कार्यालयावर पोहोचला. यावेळी “महिलांचा सन्मान राखा”, “महिलांविरोधातील विकृत मानसिकतेचा निषेध” अशा घोषणा देत नागरिकांनी निषेध व्यक्त केला. मोर्चादरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
प्रशासनाला निवेदन
मोर्चानंतर शिष्टमंडळाने तहसीलदार तसेच मुक्ताईनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांना संयुक्त निवेदन सादर केले. निवेदनात संबंधित व्यक्तीवर भारतीय न्याय संहिता (BNS) तसेच माहिती तंत्रज्ञान कायद्यातील लागू तरतुदींनुसार गुन्हा नोंदवून तातडीने अटक करण्यात यावी, तसेच महिलांविरोधातील अशा प्रकारच्या कृत्यांवर कठोर आणि उदाहरणार्थ कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली.
निवेदनात पुढे नमूद करण्यात आले आहे की, मागण्यांवर त्वरित कार्यवाही न झाल्यास मुक्ताईनगर व बोदवड तालुक्यातील सर्वपक्षीय नागरिकांच्या वतीने लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल.
सर्वपक्षीय सहभाग
या मोर्चात राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार), राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार), भारतीय जनता पक्ष, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) तसेच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आरपीआय) यांसह विविध पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते.
मान्यवरांची उपस्थिती
मोर्चात भैयासाहेब रवींद्र पाटील, प्रमोद पाटील, एस. ए. भोईसर, डॉ. जगदीश पाटील, निवृत्तीभाऊ पाटील, अनिलभाऊ पाटील, दशरथभाऊ कांडेलकर, ईश्वर रहाणे, प्रविण कांडेलकर, डॉ. बी. सी. महाजन, विलास धायडे, ललित महाजन, ॲड. राहुल पाटील, दीपक पाटील, डी. के. पाटील, लताताई सावकारे, तृप्तीताई तुषार राणे, सुनीताताई भालेराव, सुधाकर बोदडे, सागर पाटील, एजाज खान, जाविद खान, मुस्ताक मण्यार, सलीम शेख, इरफान खान, वसीम खान यांच्यासह तालुक्यातील अनेक राजकीय, सामाजिक पदाधिकारी, महिला आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.








