मुक्ताईनगर तालुक्यातील कु-हा परिसरातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ मदत द्या; एकनाथराव खडसे यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी
उप संपादक | प्रणित काठोके
मुक्ताईनगर तालुक्यातील कु-हा परिसरात २९ व ३० जुलै २०२६ रोजी झालेल्या अतिमुसळधार पावसामुळे शेती, घरे आणि नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून बाधित शेतकरी व नागरिकांना नुकसानभरपाई देण्यात यावी, अशी मागणी विधान परिषद सदस्य तथा माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी जिल्हाधिकारी, जळगाव यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
खडसे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मुसळधार पावसामुळे नदी-नाल्यांना पूर आल्याने पाणी शेतांमध्ये आणि वस्तीमध्ये शिरले. त्यामुळे उभी पिके मोठ्या प्रमाणावर पाण्याखाली गेली असून अनेक ठिकाणी पिके पिवळी पडून नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. तसेच नदीकाठावरील जमिनींचेही मोठे नुकसान झाले आहे. मात्र, एवढी गंभीर परिस्थिती निर्माण होऊनही प्रशासनाकडून अद्याप नुकसानग्रस्त भागांचे पंचनामे करण्यात आले नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.
याशिवाय, खामखेडा पुलाच्या सुरू असलेल्या बांधकामादरम्यान पाण्याच्या प्रवाहात अडथळा निर्माण झाल्यामुळे नदीचे पाणी शेतांमध्ये शिरून पिकांचे मोठे नुकसान झाल्याचा आरोपही निवेदनात करण्यात आला आहे. पुलाच्या बांधकामासाठी नदीपात्रात टाकण्यात आलेल्या माती व दगडांमुळे पाण्याचा नैसर्गिक प्रवाह अडल्याने ही परिस्थिती निर्माण झाल्याचे खडसे यांनी नमूद केले आहे.
त्यामुळे कु-हा परिसरातील सर्व बाधित भागांसह खामखेडा पुलालगतच्या शेतजमिनींचे तातडीने पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकरी व नागरिकांना शासनाकडून लवकरात लवकर आर्थिक मदत देण्यात यावी, अशी मागणी त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
या निवेदनाच्या प्रती तहसीलदार, मुक्ताईनगर तसेच तालुका कृषी अधिकारी, मुक्ताईनगर यांनाही पाठविण्यात आल्या आहेत.








