ऐतिहासिक नळदुर्ग भुईकोट किल्ल्यात दुर्दैवी घटना; आईसह मुलाचा मृत्यू, दोन मुली गंभीर जखमी
उपळी बुरुजावरून महिलेने तीन मुलांसह उडी घेतल्याची प्राथमिक माहिती; जखमी मुलींवर धाराशिव जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार

जिल्हा प्रतिनिधी लाडलेसाब नदाफ :- तुळजापूर तालुक्यातील नळदुर्ग येथील ऐतिहासिक भुईकोट किल्ल्यात गुरुवारी (३ सप्टेंबर) दुपारी सुमारे तीन वाजण्याच्या सुमारास एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली. एका महिलेने आपल्या तीन मुलांसह किल्ल्यातील उपळी बुरुजावरून उडी घेतल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या घटनेत महिलेचा आणि तिच्या एका मुलाचा मृत्यू झाला असून, दोन मुली गंभीर जखमी झाल्या आहेत. जखमी मुलींना तातडीने धाराशिव येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
प्राथमिक माहितीनुसार, अश्विनी मोहिते (रा. लोहारा, ता. उमरगा; सासर अंबुलगा, ता. निलंगा) असे मृत महिलेचे नाव असल्याचे समजते. अश्विनी मोहिते या शालेय जीवनापासूनच कुस्ती स्पर्धांमध्ये सहभागी होत असून त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली होती, अशी माहिती समोर आली आहे.
घटनेने परिसरात खळबळ
प्राथमिक माहितीनुसार, महिला आपल्या तीन मुलांसह किल्ल्यातील उपळी बुरुजावर गेली होती. त्यानंतर तिने मुलांसह बुरुजावरून उडी घेतल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेत महिला आणि एका मुलाचा मृत्यू झाला, तर दोन मुली गंभीर जखमी झाल्या.
घटनेची माहिती मिळताच परिसरात एकच खळबळ उडाली. नागरिकांनी आणि संबंधितांनी तातडीने मदतकार्य सुरू केले. जखमी मुलींना उपचारासाठी धाराशिव येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरू आहेत.
घटनेमागील कारण अद्याप अस्पष्ट
या धक्कादायक घटनेमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. नळदुर्ग पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू असून, घटनेपूर्वी नेमके काय घडले होते, याचा शोध घेतला जात आहे. पोलिसांच्या तपासानंतरच या घटनेमागील कारण स्पष्ट होणार आहे.
या घटनेमुळे नळदुर्ग शहरासह लोहारा, उमरगा आणि अंबुलगा परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. मृत महिला आणि तिच्या मुलाच्या मृत्यूने कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.








