यवत पोलिसांनी ५.७५ लाखांचे २५ गहाळ मोबाईल CEIR पोर्टल च्या माध्यमातून शोधून केले मूळ मालकांच्या स्वाधीन
प्रतिनिधी: आविनाश लोंढे
तंत्रज्ञानाची प्रभावी साथ आणि पोलिसांची अथक चिकाटी यामुळे यवत पोलिसांनी गहाळ झालेल्या तब्बल २५ महागड्या स्मार्टफोनचा शोध घेऊन ते मूळ मालकांच्या स्वाधीन केले. या मोबाईलची एकूण किंमत ५ लाख ७५ हजार रुपये असून, CEIR (Central Equipment Identity Register) पोर्टलच्या मदतीने ही उल्लेखनीय कामगिरी साध्य करण्यात आली.
पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल , अपर पोलीस अधीक्षक गणेश बिराजदार आणि उपविभागीय पोलीस अधिकारी बापुराव दडस यांच्या मार्गदर्शनाखाली यवत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संतोष तासगावकर यांनी गहाळ मोबाईलच्या वाढत्या तक्रारींची दखल घेत गुन्हे प्रकटीकरण पथकाला विशेष शोधमोहीम राबविण्याच्या सूचना दिल्या.
त्यानुसार पथकाने CEIR पोर्टलचा प्रभावी वापर करत महाराष्ट्रासह परराज्यातील मोबाईलधारकांशी सातत्याने संपर्क साधला. तांत्रिक तपास, माहितीचे विश्लेषण आणि सततचा पाठपुरावा याच्या बळावर २५ गहाळ स्मार्टफोन हस्तगत करण्यात यश आले. हे सर्व मोबाईल त्यांच्या मूळ मालकांना परत करण्यात आले असून, हरविलेला मोबाईल पुन्हा मिळाल्याने नागरिकांनी यवत पोलिसांचे मनापासून आभार मानले.
यापुढेही गहाळ मोबाईल शोधून नागरिकांना परत मिळवून देण्यासाठी अशी मोहीम अधिक प्रभावीपणे सुरू राहणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक संतोष तासगावकर यांनी दिली.
ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल , अपर पोलीस अधीक्षक गणेश बिराजदार, उपविभागीय पोलीस अधिकारी बापुराव दडस,यवत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संतोष तासगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलीस उपनिरीक्षक मारोती मेतलवाड,पोलीस अंमलदार महेंद्र चांदणे, संदीप देवकर, रॉकी देवकाते, मारुती बाराते, धीरज जाधव, अमोल भुजबळ,सचिन गुंड, शुभम मुळे, दिनेश पोळ यांनी यशस्वीरीत्या पार पाडली.








