फत्तेश्वर बंधारा जड वाहनांसाठी धोकादायक; तातडीने दुरुस्तीची ग्रामस्थांची मागणी
कवठे यमाई : प्रतिनिधी अशोक पाचुंदकर
कवठे यमाई येथील फत्तेश्वर बंधाऱ्याच्या पिलरमधील मोठमोठे दगड पाण्याच्या प्रचंड दबावामुळे वाहून गेल्याने बंधाऱ्याच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे या बंधाऱ्यावरून जड वाहनांची वाहतूक तात्पुरती बंद करून तातडीने दुरुस्तीचे काम हाती घ्यावे, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात आली आहे.
घटनास्थळी पाहणी करण्यासाठी कवठे गावचे सरपंच पांडुरंग सेठ भोर तसेच पोलीस पाटील गणेश पवार यांनी भेट दिली. पाहणीनंतर त्यांनी बंधाऱ्याची सद्यस्थिती जड वाहनांच्या वाहतुकीसाठी धोकादायक असल्याचे सांगितले. कोणतीही दुर्घटना घडण्यापूर्वी खबरदारीचा उपाय म्हणून जड वाहनांची वाहतूक तात्पुरती बंद करण्यात यावी, अशी त्यांनी प्रशासनाकडे मागणी केली.
तसेच संबंधित विभागाने बंधाऱ्याची तातडीने दुरुस्ती करून आवश्यक मजबुतीकरणाचे काम युद्धपातळीवर पूर्ण करावे, अशी मागणी सरपंच पांडुरंग सेठ भोर, पोलीस पाटील गणेश पवार तसेच समस्त कवठे यमाई ग्रामस्थांनी केली आहे.








