बीडमध्ये गाय म्हशी खरेदी करण्यासाठी 10 लाख रुपयांची सासरच्या कडून मागणी, 20 वर्षीय ऋतुजा गित्ते-नागरगोजे हिने संपविले जीवन !
(बीड जिल्हा) प्रतिनिधी. संगीता ईनकर
बीड जिल्ह्यातून एक धक्कादायक आणि मन हेलावून टाकणारी बातमी समोर आली आहे. एका 20 वर्षीय विवाहित महिलेने सासरच्या मानसिक छळाला आणि पैंशाच्या मागणीला कंटाळून राहत्या घरी आपले जीवन संपवले आहे. सौ. ऋतुजा अंकुश गित्ते नागरगोजे (वय 20) असे या विवाहित महिलेचे नाव आहे. या प्रकरणी पतीसह सासरच्या पाच जणांविरोधात युसूफ वडगांव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीवरून बीड जिल्ह्यातील केज तालुक्यांतील तळणी येथील रहिवासी गोविंदा अण्णा गित्ते यांची मुलगी होती. तिचा विवाह केज तालुक्यांतील बँकनाजा येथील अंकुश जनार्दन नागरगोजे यांच्यासोबत झाला होता. विवाहानंतर सुरुवातीच्या काळात सर्व काही सुरळीत सुरू असल्याचे कुटुंबियांकडून सांगण्यात आले होते. काही काळानंतर सासरच्या मंडळीकडून कडून पैशाची मागणी सुरू असल्याचा आरोप करण्यात आला होता. यामध्ये ऋतुजाच्या सासरच्या मंडळींकडून गाई म्हशी खरेदी करण्यासाठी 10 दहा लाख रुपये घेवुन ये असा तगादा लावला होता. या पैंशाच्या मागणीतून ऋतुजा गित्ते नागरगोजे हिने राहत्या घरी गळफास घेवुन आपले जीवन संपवले आहे. मुलीच्या वडिलांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करीत सासरकडील मंडळींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अवघ्या 20 वर्षीय ऋतुजाच्या आत्महत्येमुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेचा अधिक तपास युसूफ वडगांव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप मांजरमे करीत आहेत.*








