गुरु पौर्णिमेनिमित्त नाथश्री फाउंडेशनतर्फे शिक्षकांचा गौरव; गरजू विद्यार्थ्यांना दप्तरांचे वाटप
उप संपादक | प्रणित काठोके
गुरु पौर्णिमेचे औचित्य साधत चांगदेव येथील नाथश्री फाउंडेशनच्या वतीने श्री एस. बी. चौधरी हायस्कूलमध्ये सेवा निवृत्त मुख्याध्यापक, शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. तसेच शाळेतील आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांना मोफत दप्तरांचे वाटप करून सामाजिक बांधिलकी जपण्यात आली.
कार्यक्रमात श्री एस. बी. चौधरी हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक व्ही. एस. चौधरी तसेच हरताळे हायस्कूलचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक डी. के. पाटील यांचा नाथश्री फाउंडेशनचे अध्यक्ष मुरलीधर इंगळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. स्वाती चौधरी तसेच सर्व शिक्षकांचाही गौरव करण्यात आला.
यानंतर इयत्ता पाचवी ते दहावीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या गरजू विद्यार्थ्यांना फाउंडेशनच्या सौजन्याने मोफत दप्तरांचे वितरण करण्यात आले. विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्त्व, गुरुजनांचा आदर आणि जीवनातील यशासाठी सातत्यपूर्ण परिश्रम याविषयी माजी मुख्याध्यापक व्ही. एस. चौधरी आणि डी. के. पाटील यांनी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपशिक्षक पवन पाटील यांनी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे संचालक डिगंबर रामचंद्र चौधरी होते.
यावेळी श्रीमती आरती राजेंद्र चौधरी, संस्थेचे सचिव विनोद महाजन, संचालक विनायक पाटील, जे. के. चौधरी, अतुल पाटील यांच्यासह नाथश्री फाउंडेशनचे अध्यक्ष मुरलीधर इंगळे, सौ. आरती इंगळे, उपाध्यक्ष देवेंद्र काटे, सचिव अनिकेत सोनवणे तसेच सदस्य अक्षय कोळी, ईश्वर सोनवणे, रूपेश सोनवणे, प्रशांत पाटील आणि मंगेश भुसारी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी मोलाचे सहकार्य केले.








