बंजारा अभाषिक बांधवांनो, गैरसमज नको! आमची लढाई ही न्याय्य, रास्त आणि लोकशाही मार्गाने –मा.किसनभाऊ राठोड
पुणे प्रतिनिधी अनघलक्ष्मी दुर्गा
आज महाराष्ट्रातील बंजारा समाज आपल्या हक्कासाठी, न्यायासाठी आणि अस्तित्वासाठी रस्त्यावर उतरला आहे. मागील अनेक दिवसांपासून संपूर्ण राज्यभर शांततेच्या मार्गाने मोर्चे, निदर्शने आणि आंदोलनांचे आयोजन केले जात आहे. उद्दिष्ट एकच – बंजारा समाजाचा न्याय्य हक्क शासनापर्यंत पोहोचवणे. सकल बंजारा समाज यांच्या नेतृत्वात राज्यस्तरावर भव्य प्रमाणात मोर्चाचे आयोजन करण्यात येणार आहे. तसेच, भविष्यात देश पातळीवरही प्रचंड स्वरूपाचे मोर्चे निघणार आहेत, जे बंजारा समाजाच्या एकतेची आणि न्यायासाठीच्या आर्त हाकीची स्पष्ट साक्ष देतील.
बंजारा समाज हा खऱ्या अर्थाने शोषित, पीडित आणि वंचित राहिलेला समाज आहे. शिक्षण, रोजगार, विकास यापासून वंचित राहिलेला, गावगाड्यांपासून अलिप्त आणि भटकंती करणारा हा समाज आहे. निजामशाही व ब्रिटिश राजवटीच्या आधीपासूनच हैदराबाद गॅझेटमध्ये बंजारा समाज मूळ आदिवासी असल्याची स्पष्ट नोंद आहे. त्यामुळे हा हक्क केवळ आजचा नाही, तर ऐतिहासिक आणि न्याय्य हक्क आहे.
काही बांधवांना गैरसमज होतो की बंजारा समाज आपला हिस्सा हिसकावतो आहे, पण हा पूर्णपणे चुकीचा समज आहे. बंजारा समाजाने कधीही कुठल्याही समाजाविरुद्ध भूमिका घेतलेली नाही. आमची मागणी एकच – हक्क हवा, पण कुणाचं नुकसान नको. आम्हाला न्याय आणि समान संधी हवी आहे, कुणावर अन्याय करून नाही. बंजारा समाजाचा हा लढा लोकशाही मार्गाने, शांततेच्या बळावर आणि कायदेशीर पद्धतीने सुरू आहे. त्यामुळे इतर समाज बांधवांनी याबाबत गैरसमज करू नये. ही लढाई कुणाविरुद्ध नसून फक्त आपल्या हक्कासाठीची आहे.असे बंजारा हृदय सम्राट धर्मनेता भगवंत सेवक मा.किसनभाऊ राठोड यांनी यावेळी स्पष्ट केले आहे.
जर शासनाने सहकार्याची भूमिका घेऊन योग्य कार्यवाही केली नाही, तर सकल बंजारा समाजाच्या नेतृत्वात मुंबईसह दिल्लीमध्ये प्रचंड प्रमाणात मोर्चे निघविण्याची तयारी दर्शविली आहे.
आम्ही कुणाविरुद्ध नाही, तर आपल्या हक्कासाठी लढतो आहोत. शिक्षण, रोजगार आणि विकास यामध्ये न्याय मिळवण्यासाठी आमचा लढा लोकशाही मार्गाने, शांततेच्या बळावर आणि संविधानिक पद्धतीने सुरू आहे. कुणाच्या हक्काला धक्का न लावता आम्हाला आमचा न्याय्य हक्क मिळालाच पाहिजे. हा लढा हा भावनांचा आहे, हक्काचा आहे आणि तो पूर्णपणे लोकशाही मार्गानेच लढला जाईल.असे राष्ट्रीय बंजारा परिषदेचे प्रदेश उपाध्यक्ष प्रेमकिसन राठोड यांनी एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.








