मुंबईकरांचे रक्त विकण्याचा मिंध्ये-भाजप सरकारचा डाव”; आदित्य ठाकरे आक्रमक
मुंबई प्रतिनिधी:- दौलत सरवणकर
मुंबईतील मैदाने, ग्रीन झोन आणि मुंबई महानगर पालिकेच्या रक्तपेढ्यांच्या खासगीकरणाच्या मुद्द्यावरून शिवसेना नेते,युवासेना प्रमुख,आमदार आदित्य ठाकरे यांनी मिंध्ये सरकार आणि प्रशासनावर जोरदार हल्लाबोल केला. दादर येथील शिवसेना भवन येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी मुंबई महापालिकेच्या कारभारावर गंभीर प्रश्न उपस्थित करत विकासाच्या नावाखाली मुंबईतील मोकळ्या जागा बिल्डरांच्या घशात घालण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप केला.
आदित्य ठाकरे म्हणाले की मुंबई महापालिका मधील सुधार समितीचे काम पाहता आता तिचे नाव “बिघाड समिती” ठेवण्याची वेळ आली आहे. प्रशासकांच्या कार्यकाळात अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले गेले असून त्याबाबत श्वेतपत्रिका जाहीर करावी अशी मागणीही त्यांनी केली. 20 तारखेला होणारी सुधार समितीची बैठक 19 तारखेलाच अचानक रद्द करण्यात आल्याचा उल्लेख करत डील पूर्ण झाली नसल्यामुळेच बैठक रद्द झाली असा गंभीर आरोप त्यांनी केला.
रक्तपेढ्यांच्या खासगीकरणाच्या मुद्द्यावर बोलताना त्यांनी सांगितले की मुंबई महानगरपालिकेच्या मोफत रक्तपेढ्या खासगीकरणाच्या दिशेने नेल्या जात आहेत. सध्या रक्तपिशवीसाठी 1100 रुपये घेतले जात असून पुढे हे दर 1600 ते 2000 रुपयांपर्यंत वाढू शकतात. मुंबईकरांचे रक्त विकण्याचा हा प्रकार आहे असा आरोप करत त्यांनी भाजपने यावर स्पष्ट भूमिका मांडावी अशी मागणी केली.
तसेच मुंबईतील विविध मैदानांवर निवासी आणि व्यावसायिक प्रकल्प उभारण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप करत त्यांनी वांद्रे पश्चिम येथील फुटबॉल मैदानावर एक्झिबिशन सेंटर आणि डी वॉर्डमधील मैदानावर निवासी प्रकल्पाच्या हालचालींचा उल्लेख केला. मोकळी मैदाने हटवून बिल्डरांना इमारती बांधण्यासाठी दिली जात आहेत आम्ही एक वीटसुद्धा लावू देणार नाही असा इशाराही त्यांनी दिला.
पत्रकार परिषदेतील महत्वाचे ३ मुद्दे :
* मुंबई महानगरपालिकाकेच्या रक्तपेढ्यांच्या खासगीकरणावर आदित्य ठाकरे यांचा तीव्र विरोध
* मुंबईतील मैदाने, ग्रीन झोन आणि मोकळ्या जागा बिल्डरांना दिल्या जात असल्याचा आरोप
* सुधार समितीची बैठक रद्द होण्यामागे “डील” असल्याचा गंभीर दावा








