अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
कर्मचाऱ्यांच्या सेवा विषयक नोंदी ऑनलाईन करण्यावर भर
जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर
सेवा पंधरवड्यानिमित्त सेवापुस्तक अद्ययावतीकरण कार्यक्रमाचे आयोजन
प्रतिनिधी सतीश कडू नागपूर
नागपूर, दि.२२ : सेवा पुस्तक हे शासकीय कर्मचाऱ्यांच्या नोकरीच्या इतिहासाची, शैक्षणिक माहितीची, बढतीची आणि इतर सेवा-संबंधित तपशीलांची नोंद असलेले एक महत्त्वाचे दस्तऐवज आहे. हे प्रत्येक कर्मचाऱ्याच्या सेवेचा एक अभिलेख म्हणून कार्य करते. वर्ग एक व वर्ग दोन च्या अधिकाऱ्यांच्या सेवा विषयक महत्त्वाच्या नोंदी eHRMS प्रणालीवर नोंदविल्या आहेत. त्याप्रमाणेच वर्ग तीन व वर्ग चारच्या कर्मचाऱ्यांच्या देखील सेवाविषयक महत्त्वाच्या नोंदी ऑनलाईन प्रणालीवर घेण्याबाबत प्रशासनाचा प्रयत्न असणार आहे. तहसील स्तरावर प्रलंबित असणाऱ्या सेवानिवृत्ती प्रकरणाचा देखील आढावा व प्रकरण निकाली काढण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी आज येथे सांगितले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवन सभागृहात आज सेवा पंधरवड्यानिमित्त सेवा पुस्तक अद्ययावतीकरण व तपासणीचे आयोजन करण्यात आले होते. यानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी अनुप खांडे, तहसिलदार स्नेहलता पाटील मेंढे यांच्यासह जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी पुढे म्हणाले की, निवासी उपजिल्हाधिकारी अनुप खांडे यांच्या नेतृत्वात एका चांगल्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सेवेतील सर्व नोंदीची पडताळणी केली जाते.सेवापुस्तकात कोणतेही खोडतोड किंवा चुकीच्या नोंदी नाहीत याची खात्री केली जाते. सर्व नोंदी योग्य पद्धतीने प्रमाणित केल्या जातात. कर्मचाऱ्यांच्या सेवेतील प्रगतीचे योग्य दस्तऐवजीकरण होते. सेवा पुस्तक हे कर्मचाऱ्यांच्या सेवाकाळातील प्रगतीचे दस्तऐवजीकरण करते. यामुळे सर्व नोंदी अद्ययावत राहतात आणि कर्मचाऱ्याला त्याच्या सेवेचा संपूर्ण इतिहास मिळतो. सेवापुस्तकांमध्ये सर्व नोंदी योग्य व नियमांनुसार केल्या जाव्यात, असे ते पुढे म्हणाले.
सेवा पंधरवडा हा राष्ट्रनेता नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस (१७ सप्टेंबर) ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती (२ ऑक्टोबर) या काळात साजरा होणारा कार्यक्रम आहे. या पंधरवड्याअंतर्गत ज्यात शासकीय कर्मचाऱ्यांच्या कामाचा अनुभव तसेच इतर नोंदींची नोंद असलेल्या सेवा पुस्तकाचे (सर्व्हिस बुक) अद्ययावतीकरण व तपासणी केली जात आहे. या काळात शासकीय कार्यालयांमध्ये कर्मचाऱ्यांच्या सेवापुस्तकातील नोंदी तपासून त्या अद्ययावत करण्यावर आणि कर्मचाऱ्यांच्या सेवेतील प्रगतीचे दस्तऐवजीकरण करण्यावर भर दिला जात आहे.










