प्रतिनिधी – किशोर रमाकांत गुडेकर, मुंबई विभाग प्रतिनिधी प्रमुख
ट्रॉमा हॉस्पिटलमधील कर्मचाऱ्यांचा संप सुरु – भारतीय कामगार सेनेचा निर्धार
मुंबई, दि. २६ जून (प्रतिनिधी):
जोगेश्वरी पूर्व येथील ट्रॉमा केअर म्युनिसिपल हॉस्पिटलमधील विविध विभागांमध्ये कार्यरत असलेल्या एमपीएल व हाऊसकीपिंग कर्मचाऱ्यांनी आज संध्याकाळपासून संप पुकारला आहे. भारतीय कामगार सेनेने १४ दिवसांपूर्वी दिलेल्या संपाच्या नोटीशीनंतरही व्यवस्थापनाने मागण्या मान्य केल्या नसल्याने अखेर कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचा मार्ग पत्करला आहे.
कामगारांच्या प्रमुख मागण्या खालीलप्रमाणे आहेत:
पीएफ व ईएसआयचा थकित भरणा
कोविड काळात मृतदेह हाताळणाऱ्या कर्मचाऱ्यांना विशेष भत्ता ₹५०० व ₹३०० ची देयके
२०२५ च्या मे महिन्याचा थकित पगार
या मागण्यांसाठी भारतीय कामगार सेनेचे संयुक्त सरचिटणीस श्री. संजय शंकर कदम यांच्या नेतृत्वाखाली आज दुपारी ३ वाजता हॉस्पिटल मॅनेजमेंटबरोबर बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीसाठी मॅनेजमेंटने व्हॉट्सअॅपद्वारे पत्र पाठवून विनंती केली होती. मात्र, चर्चेअंती कोणताही ठोस निर्णय न घेतल्यामुळे अखेर संध्याकाळपासून संपाची हाक देण्यात आली आहे.
कामगारांनी २.३० वाजता हॉस्पिटलमध्ये एकत्र येऊन एकजुटीने आपल्या मागण्यांचा पुन्हा जोरदार आवाज उठवला.
“कामगारांवर अन्याय सहन केला जाणार नाही” – संजय कदम यांचा इशारा
“पीएफ, ईएसआय आणि वेतन थकबाकी हा केवळ आर्थिक प्रश्न नसून कामगारांच्या प्रतिष्ठेचा प्रश्न आहे. प्रशासनाने याकडे गांभीर्याने पाहिले नाही, त्यामुळे आमचा संघर्ष निर्णायक होईपर्यंत सुरू राहील,” असे संजय शंकर कदम यांनी स्पष्ट केले आहे.
