अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरुवात
प्रतिनिधी सतीश कडू नागपूर
विदर्भाच्या विकासासाठी किमान ५० हजार कोटींचे सामंजस्य करार ‘अॅडव्हान्टेज विदर्भ’ मध्ये होण्याची अपेक्षा केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची माहिती
नागपूर ,24 जानेवारी 2025
विदर्भाच्या विकासासाठी किमान 50 हजार कोटींचे सामंजस्य करार एडवांटेज विदर्भ मध्ये होतील अशी अपेक्षा केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केली. नागपूर आणि गडचिरोली विभागात मोठ्या प्रमाणात पोलाद उद्योग येत आहेत. या औद्योगिक महोत्सवात मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आणखी करार होण्याची शक्यता असल्याचे ते म्हणाले.
असोसिएशन फॉर इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट (एआयडी) द्वारे 7 ते 9 फेब्रुवारी दरम्यान नागपूरमधील अमरावती रोड येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाच्या कॅम्पस ग्राउंड येथे ‘अॅडव्हान्टेज विदर्भ २०२५: खासदार औद्योगिक महोत्सवा’चे आयोजन करण्यात आले आहे. यासंदर्भात प्रसारमाध्यमांना माहिती देतांना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी बोलत होते . याप्रसंगी रामटेकचे खासदार शामकुमार बर्वे , असोसिएशन ऑफ इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंटचे अध्यक्ष आशिष काळे प्रामुख्याने उपस्थित होते .
या तीन दिवसीय औद्योगिक महोत्सवाबाबत माहिती देताना नितीन गडकरी म्हणाले, आपली प्राथमिकता सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, दृष्टीने मागासलेला गडचिरोली जिल्हा असून आगामी पाच वर्षात गडचिरोली जिल्हा हा महाराष्ट्राला सर्वाधिक महसूल देणारा जिल्हा ठरेल हे स्वप्न आता पूर्ण होण्याकडे वाटचाल करत आहे.
गडकरी पुढे म्हणाले की, नागपूरला आपल्याला लॉजिस्टिक कॅपिटल बनवायचे आहे. अजनी स्थानकाचा विकास रेल्वे करणार, असून त्यासाठी राज्य सरकार आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण – एनएचएआयतर्फे देऊ करण्यात आलेला निधी आता वर्धा जिल्ह्यातील सिंधी ड्रायपोर्टसाठी वापरला जाणारा आहे. मिहानमध्ये मोठ्या प्रमाणात उद्योग येत असून मिहानचे विस्तारीकरण करण्याची मागणी आपण मुख्यमंत्र्यांकडे केल्याची माहिती त्यांनी दिली. मदर डेअरीच्या 670 कोटींच्या मोठ्या प्रकल्पावर देखील काम सुरू होत असल्याचे ते म्हणाले.
याशिवाय खाण आणि खनिज तसेच पर्यटन विकासाबद्दल ही त्यांनी चर्चा केली .
मागील वर्षी मिळालेल्या भरघोस यशानंतर वर्षीच्या अॅडव्हांटेज विदर्भचे मुख्य उद्दिष्ट विदर्भाला उद्योगासाठी जागतिक केंद्र म्हणून स्थापित करण्यासाठी धोरणात्मक फायदे, दळण-वळण सुविधा आणि अफाट वाढीची क्षमता प्रदर्शित करणे हे आहे. या महोत्सवाच्या माध्यमातून राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय धोरणकर्ते, गुंतवणूकदार, उद्योगपती, उद्योजक आणि शिक्षणतज्ज्ञांसह विविध क्षेत्रातील उदयोन्मुख व्यावसायिकांना आकर्षित केले जाईल.
‘अॅडव्हांटेज विदर्भ’ या परिषदे मध्ये मुख्य अतिथी म्हणून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी उपस्थित राहणार आहेत . याशिवाय मुंबईतील थाई कॉन्सुल-जनरल डोनावित पूलसावत, केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल, उद्योग मंत्री उदय सामंत, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, महाराष्ट्र सरकारचे आयटी मंत्री आशिष शेलार, वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, अर्थ राज्यमंत्री आशिष जयस्वाल, गृह (ग्रामीण) आणि खाणकाम राज्यमंत्री पंकज भोयर, भारतीय लष्कराचे माजी प्रमुख जनरल मनोज पांडे, यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहतील.
या औद्योगिक प्रदर्शनात विविध उत्पादने आणि बहु-क्षेत्रीय उद्योगांचा समावेश असेल, ज्यामध्ये ३०० हून अधिक स्टॉल असतील, ज्यात १०० सूक्ष्म आणि लघु उद्योगांसाठी राखीव असतील. इतर स्टॉलमध्ये संरक्षण सार्वजनिक उपक्रम, स्टील आणि खाण मंत्रालय, भारतीय विमानतळ प्राधिकरण, सेबी, केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळ, जीएसटी विभाग, पोस्ट विभाग, सरकारी ई-मार्केटप्लेस (जीईएम), शैक्षणिक संस्था यासारख्या सरकारी विभागांकडून विविध क्षेत्रातील उत्पादन श्रेणी, यंत्रसामग्री आणि सेवा प्रदर्शित केल्या जातील. १७० स्टॉल्स आधीच बुक करण्यात आले आहेत आणि व्यवसायांना लवकरात लवकर त्यांचे स्टॉल्स बुक करण्यास प्रोत्साहित केले जात आहे.
स्टार्टअपसह विविध क्षेत्रांचा समावेश
अॅडव्हांटेज विदर्भमध्ये स्टील, संरक्षण, विमान वाहतूक, बांबू, दुग्धव्यवसाय, शिक्षण, आयटी आणि आयटीईएस, लॉजिस्टिक्स, स्टार्टअप्स, फार्मास्युटिकल्स, अक्षय ऊर्जा, पर्यटन, वस्त्रोद्योग, रत्ने आणि दागिने, स्टार्टअप इकोसिस्टम एंगेजमेंट यासह विविध क्षेत्रांमध्ये व्यवसाय सेमिनार आणि तांत्रिक चर्चा आयोजित केल्या जातील. स्टार्टअप क्षेत्रावर विशेष लक्ष केंद्रित केले जाईल.
भंडारा येथील ऑर्डिनन्स फॅक्टरीमध्ये झालेल्या स्फोटातील मृतकांना यावेळी श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. तसेच, अॅडव्हांटेज विदर्भच्या टी-शर्टचे अनावरण करण्यात आले.
व्यावसायिक आणि उद्योजकांना त्यांच्या स्टॉलची अधिकृत वेबसाइट www.advantagevidarbha.in वर नोंदणी करून कार्यक्रमात सहभागी होता येईल.
विदर्भातील उद्योगांना सहभागी होण्याचे आवाहन
विदर्भाच्या औद्योगिक विकासासाठी आयोजित करण्यात आलेल्या ‘अॅडव्हांटेज विदर्भ – 2025’ मध्ये वर्धा, अमरावती, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा आदी विदर्भातील जिल्ह्यातील उद्योग, औद्योगिक संस्था व संघटनांनी मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावे व विदर्भाच्या विकासात हातभार लावावा, असे आवाहन यावेळी नितीन गडकरी यांनी केले.
याप्रसंगी प्रास्ताविकात असोसिएशन फॉर इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट इंडिया संस्थेचे अध्यक्ष आशिष काळे यांनी सांगितले की गव्हर्मेंट ईमार्केट प्लेस – जेम या प्रोक्युरिंग पोर्टलवरून सूक्ष्म लघु आणि मध्यम एककांना शासकीय विभागांना आपली उत्पादने पुरवण्यासाठी ज्या अडचणी जात आहेत त्यावर मार्गदर्शन करण्यासाठी जेम पोर्टलचे अधिकारी सुद्धा या औद्योगिक महोत्सवात उपस्थित राहणार आहेत
