भुसावळात गावठी बनावटीचे पिस्तूल व दोन जिवंत राऊंड जप्त; तरुणाला ताब्यात
उप संपादक | प्रणित काठोके
भुसावळ शहर पोलिसांनी मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे कारवाई करत एका तरुणाला गावठी बनावटीचे पिस्तूल व दोन जिवंत राऊंडसह ताब्यात घेतले. ही कारवाई दि. ३ सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ६.३० वाजता भुसावळ येथील टेक्निकल हायस्कूल परिसरात करण्यात आली.
पोलिस निरीक्षक महेश गायकवाड हे भुसावळ शहर पोलीस स्टेशन व गुन्हे प्रकटीकरण पथकातील अंमलदारांसह हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना, उपविभागीय पोलीस अधिकारी केदार बारबोले यांना गोपनीय माहिती मिळाली. गण्या लोहार नावाचा इसम टेक्निकल हायस्कूल, भुसावळ येथे गावठी बनावटीचा कट्टा जवळ बाळगून उभा असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.
माहितीची खात्री करण्यासाठी पोलिस निरीक्षक महेश गायकवाड व गुन्हे प्रकटीकरण पथकाने घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी एक इसम संशयितरीत्या फिरताना आढळून आला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन पंचांसमक्ष चौकशी केली असता त्याने आपले नाव गणेश संतोष लोहार (वय २१, रा. महात्मा फुले नगर, भुसावळ) असे सांगितले.
झडतीदरम्यान त्याच्या पॅन्टच्या मागील बाजूस कमरेला खोचलेले गावठी बनावटीचे पिस्तूल (अग्निशस्त्र) मॅगझीनसह आणि दोन जिवंत राऊंड मिळून आले. पोलिसांनी सदर मुद्देमाल जप्त करून संशयिताला ताब्यात घेतले असून पुढील कारवाईसाठी त्याला भुसावळ शहर पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले आहे.
जप्त मुद्देमाल
सुमारे ३० हजार रुपये किमतीचे गावठी बनावटीचे पिस्तूल (अग्निशस्त्र), मॅगझीनसह
सुमारे २ हजार रुपये किमतीचे दोन जिवंत राऊंड
सदर गावठी बनावटीचा कट्टा त्याने कोठून आणला आणि त्याचा वापर कशासाठी करणार होता, याबाबत पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे. आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया भुसावळ शहर पोलीस ठाण्यात सुरू असल्याचे प्रेस नोटमध्ये नमूद करण्यात आले आहे.
ही उल्लेखनीय कारवाई जळगावचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गवळी आणि भुसावळ उपविभागीय पोलीस अधिकारी केदार बारबोले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक महेश गायकवाड, गुन्हे प्रकटीकरण पथकाचे अंमलदार दिपक शेवरे, गजानन पाटील, राहुल बेहनवाल, कुणाल सोनवणे व अविनाश पाटील (चालक) यांनी केली.








