डॉ. रेड्डी यांची बदली; जळगावच्या एसपीपदी श्रीकांत धिवरे
प्रतिनिधी | प्रणित काठोके
राज्य सरकारच्या गृह विभागाने भारतीय पोलीस सेवेतील (IPS) अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जाहीर केले असून, त्यामध्ये अनेक महत्त्वाच्या पदांवर फेरबदल करण्यात आले आहेत. या निर्णयानुसार जळगाव जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांची बदली करण्यात आली आहे.
डॉ. रेड्डी यांनी आपल्या कार्यकाळात जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी विविध उपाययोजना राबवल्या. गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्यासाठी त्यांनी घेतलेले निर्णय आणि अंमलात आणलेले उपक्रम उल्लेखनीय ठरले.
त्यांच्या जागी धुळे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रीकांत ढिवरे यांची जळगाव जिल्ह्याच्या नव्या एसपीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. अनुभवी अधिकारी म्हणून ओळख असलेल्या ढिवरे यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील पोलीस यंत्रणा अधिक सक्षम होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
दरम्यान, राज्यातील इतरही अनेक अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. त्यानुसार निखिल पिंगळे यांची पुणे येथून सातारा येथे, राजकुमार शिंदे यांची पुणे येथून वाशीम येथे पोलीस अधीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच तुषार दोशी यांची सातारा येथून सांगली येथे बदली झाली आहे.
याशिवाय, संदीप घुगे यांना सांगलीहून मुंबईतील राज्य गुप्तवार्ता विभागात पोलिस उपायुक्त (सुरक्षा) म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. योगेश गुप्ता यांची कोल्हापूरहून गडचिरोली परिक्षेत्रात पोलिस उपमहानिरीक्षक म्हणून बदली झाली आहे, तर नीलोत्पल यांची गडचिरोलीहून कोल्हापूर येथे नेमणूक करण्यात आली आहे. एम. रमेश यांची गडचिरोली येथेच पोलिस अधीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
या बदल्यांमुळे राज्यातील पोलीस प्रशासनात नव्या उर्जेची भर पडेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.








