माहोराच्या अभिषेक शिंदेचा चित्रपटसृष्टीकडे प्रवास; एडिटिंग स्टुडिओपासून ‘धाराऊ’ चित्रपटाच्या एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसरपर्यंत मजल
लॉकडाऊनच्या काळात गावातच काहीतरी करण्याचा घेतला निर्णय; मित्र मयूर परमारच्या साथीने चित्रपट क्षेत्रात उभा केला स्वतःचा प्रवास
प्रतिनिधी – सारंग महाजन.
माहोरा, ता. जाफ्राबाद, जि. जालना : जिद्द, मेहनत आणि चित्रपट क्षेत्राविषयी असलेल्या आवडीतून माहोरा येथील अभिषेक शिंदे याने चित्रपटसृष्टीत स्वतःची ओळख निर्माण करण्याच्या दिशेने वाटचाल सुरू केली अभिनयाचे प्रशिक्षण, वेडिंग व्हिडिओ एडिटिंग, स्वतःचा एडिटिंग स्टुडिओ आणि त्यानंतर चित्रपट निर्मिती क्षेत्रातील सहभाग असा त्याचा प्रवास राहिला आहे. बुलढाणा अर्बन निर्मित मनिष शिंदे दिग्दर्शित ‘धाराऊ’ या चित्रपटात एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर म्हणून काम करण्यापर्यंत त्याने मजल मारली .

अभिषेक शिंदे याला लहानपणापासूनच अभिनय आणि चित्रपट क्षेत्राची आवड होती. २०१९ मध्ये पुणे येथे मनिष दादा शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली अभिनयाचे प्रशिक्षण पूर्ण केले. त्यानंतर हॉटेल क्षेत्रात काम केल्यानंतर तो आपल्या गावी परतला. याच काळात लॉकडाऊन सुरू झाल्याने पुढे काय करायचे, हा प्रश्न त्याच्यासमोर उभा राहिला. गावात राहूनच काहीतरी वेगळे करण्याचा त्याने निर्णय घेतला; मात्र त्यावेळी उत्पन्नाचे निश्चित साधन नव्हते. अशा परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी त्याने वेडिंग व्हिडिओ एडिटिंग शिकण्याचे ठरवले. त्यासाठी तो चिखली येथे आपल्या मामाकडे गेला. एडिटिंगचे कौशल्य आत्मसात केल्यानंतर त्याने आपल्या गावात स्वतःचा एडिटिंग स्टुडिओ सुरू केला. अभिषेक उच्चशिक्षित असून बी.एस्सी. पदवीचे शिक्षणही पूर्ण केले आहे.

या प्रवासात त्याला मयूर परमार या मित्राची साथ मिळाली. मयूरलाही चित्रपट क्षेत्राची आवड असल्याने दोघांनी एकत्र काम करण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीला त्यांनी झी म्युझिक मराठीसाठी एका गाण्यावर काम केले. त्यानंतर विविध प्रोजेक्ट्सच्या माध्यमातून त्यांनी आपला अनुभव वाढवला. छोट्या कामांपासून सुरुवात करत चित्रपट निर्मितीपर्यंत पोहोचण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू राहिला.या दोघांच्या प्रवासातील महत्त्वाचा टप्पा म्हणजे ‘धाराऊ’ हा चित्रपट. या चित्रपटासाठी अभिषेक शिंदे आणि मयूर परमार यांनी एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर म्हणून काम केले. एडिटिंग आणि गाण्यांच्या प्रोजेक्ट्सपासून सुरू झालेला प्रवास चित्रपटाच्या निर्मिती प्रक्रियेपर्यंत पोहोचल्याने त्यांच्या वाटचालीला नवी दिशा मिळाली आहे.
सध्या अभिषेक शिंदे हा OTP – Off Beat Takes Productions या माध्यमातून चित्रपट क्षेत्रात पुढे जाण्याचा प्रयत्न करत आहे. यूट्यूबवरील गाणी, चित्रपटविषयक प्रोजेक्ट्स आणि आगामी चित्रपटांसाठी सुरू असलेल्या चर्चांच्या माध्यमातून तो आपल्या कामाचा विस्तार करण्याच्या तयारीत आहे.मराठी चित्रपटसृष्टीत स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणे, चांगल्या कथा प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणे आणि आपल्या भागातील इच्छुक कलाकार व सहकाऱ्यांना सोबत घेऊन पुढे जाणे, हे अभिषेकचे ध्येय आहे. गावातून सुरू झालेला हा प्रवास मेहनत, कौशल्य आणि योग्य संधींच्या बळावर चित्रपट क्षेत्रात पुढे जाण्याची त्याची जिद्द अधोरेखित करतो.







