माहिती अधिकार पत्रकार संरक्षण व पोलिसमित्र समितीचा राज्यस्तरीय महामेळावा १२ जुलैला जालन्यात;
राज्यातील ३२ जिल्ह्यांतील पदाधिकारी, सदस्य आणि कार्यकर्त्यांची भव्य उपस्थिती अपेक्षित
अजिंक्य महाराष्ट्र न्यूज उप संपादक गणेश महाडिक
जालना : माहिती अधिकार पत्रकार संरक्षण व पोलिसमित्र समितीच्या राज्यस्तरीय पदाधिकाऱ्यांच्या महत्त्वपूर्ण बैठकीत सर्वानुमते समितीचा राज्यस्तरीय महामेळावा जालना येथे आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हा महामेळावा रविवार, दि. १२ जुलै २०२६ रोजी जालना येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडणार असून राज्यातील तब्बल ३२ जिल्ह्यांतील पदाधिकारी, सदस्य, पत्रकार, पोलिसमित्र आणि संघटनेचे हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत अशी माहिती संघटनेचे संस्थापक तथा महाराष्ट्र राज्य अध्यक्ष महेश सारणीकर यांनी सांगितले.
संघटनेच्या राज्यस्तरीय बैठकीत झालेल्या चर्चेनंतर मेळाव्याचे ठिकाण जालना निश्चित करण्यात आले. संघटनेच्या विस्तारासाठी, कार्यकर्त्यांमध्ये समन्वय वाढविण्यासाठी तसेच आगामी काळातील संघटनात्मक वाटचालीची दिशा ठरविण्यासाठी हा महामेळावा महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
राज्याच्या विविध भागांतून येणाऱ्या पदाधिकारी व सदस्यांच्या सोयीसाठी निवासाची विशेष व्यवस्था करण्यात येणार आहे. विशेषतः महिला पदाधिकारी व सदस्यांसाठी स्वतंत्र, सुरक्षित आणि सुसज्ज निवास व्यवस्था उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे दूरवरून येणाऱ्या प्रतिनिधींना कोणतीही अडचण निर्माण होणार नाही, याची दक्षता आयोजकांकडून घेतली जाणार आहे.
या महामेळाव्यात संघटनेच्या कार्याचा आढावा, माहिती अधिकार चळवळीची सद्यस्थिती, पत्रकार संरक्षणाचे विविध मुद्दे, पोलिसमित्र उपक्रम, सामाजिक बांधिलकी, संघटनात्मक विस्तार, नवीन सदस्य नोंदणी, तसेच आगामी वर्षासाठीची कार्यदिशा यावर सखोल चर्चा होणार आहे. राज्यभरातील अनुभवी पदाधिकारी आणि मान्यवरांचे मार्गदर्शनही उपस्थितांना लाभणार आहे.
संघटनेच्या राज्य नेतृत्वाने प्रत्येक जिल्ह्यातून जास्तीत जास्त पदाधिकारी, सदस्य आणि कार्यकर्त्यांनी या महामेळाव्यास उपस्थित राहावे, असे आवाहन केले आहे. राज्यातील माहिती अधिकार कार्यकर्ते, पत्रकार आणि पोलिसमित्र यांना एकत्र आणणारा हा मेळावा संघटनेच्या इतिहासातील एक महत्त्वपूर्ण टप्पा ठरणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.
जालना नगरीत होणाऱ्या या भव्य राज्यस्तरीय महामेळाव्याकडे आता संपूर्ण महाराष्ट्रातील संघटनेच्या पदाधिकारी व सदस्यांचे लक्ष लागले असून, संघटनात्मक एकजूट आणि जनहिताच्या लढ्याला नवी ऊर्जा देणारा हा मेळावा ठरेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.








