आष्टीत सिग्नल उभे, पण सुरू होण्याचा मुहूर्त कधी? नागरिकांचा संतप्त सवाल
गडचिरोली प्रतिनिधी | मनोज उराडे
चामोर्शी तालुक्यातील प्रमुख व्यापारी व शैक्षणिक केंद्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आष्टी शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी लाखो रुपये खर्चून अत्याधुनिक सिग्नल यंत्रणा उभारण्यात आली. मात्र, महिना उलटूनही हे सिग्नल अद्याप सुरू करण्यात आले नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. “सिग्नल बसवले खरे, पण ते सुरू करण्याचा मुहूर्त प्रशासनाला अजून सापडला नाही काय?” असा संतप्त सवाल आता आष्टीकरांकडून उपस्थित केला जात आहे. आष्टी शहरातून दररोज सुरजागड प्रकल्पातील लोहखनिज वाहतूक करणारी शेकडो जड वाहने ये-जा करतात. परिणामी आंबेडकर चौकात दिवसातून अनेकदा वाहतुकीचा अक्षरशः ठप्प होणारा खेळ सुरू असतो. वाहनांच्या लांबच लांब रांगा, सतत वाजणारे हॉर्न आणि नागरिकांची होणारी गैरसोय यामुळे चौकातील परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे.
या प्रश्नाची गंभीरता लक्षात घेऊन ग्रामीण पत्रकार संघाने सातत्याने पाठपुरावा करत चौकात वाहतूक सिग्नल बसविण्याची मागणी केली होती. पत्रकार संघाच्या प्रयत्नांना यश मिळाले आणि प्रशासनाने सिग्नल यंत्रणा उभारली. परंतु दुर्दैवाने, लाखो रुपयांचा खर्च करून बसविण्यात आलेली ही यंत्रणा आजही केवळ सजावटीचा भाग बनून उभी आहे. नागरिकांना दिलासा देण्याऐवजी ती प्रशासनाच्या निष्क्रियतेची साक्ष देत असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.
सिग्नल कार्यान्वित झाल्यास चौकातील वाहतूक नियंत्रित होऊन वाहनचालकांना दिलासा मिळेल, अपघातांची शक्यता कमी होईल आणि नागरिकांचा अमूल्य वेळ वाचेल, अशी अपेक्षा होती. मात्र, संबंधित विभागाच्या दुर्लक्षामुळे ही संपूर्ण यंत्रणा धूळ खात पडली आहे. पावसाळ्याचे दिवस तोंडावर आले असताना वाहतूक कोंडीची समस्या आणखी गंभीर होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे प्रशासनाने कोणत्याही औपचारिकतेची किंवा मुहूर्ताची वाट न पाहता सिग्नल तातडीने सुरू करावेत, अशी जोरदार मागणी होत आहे.
शाळकरी मुले, विद्यार्थी आणि नोकरदार वेठीस
सकाळी शाळा व महाविद्यालयांच्या वेळेत तसेच संध्याकाळी कार्यालये सुटण्याच्या वेळी आंबेडकर चौकात प्रचंड गर्दी होते. याच काळात जड वाहनांची रहदारी वाढल्याने विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि नोकरदार वर्गाला मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागते. अनेकदा रस्ता ओलांडण्यासाठी नागरिकांना जीव मुठीत धरून उभे राहावे लागते.
विशेष म्हणजे चौकाच्या दोन्ही बाजूंना असलेल्या फळविक्रेत्यांच्या हातगाड्या, चहाच्या टपऱ्या, स्वीट मार्ट आणि इतर व्यावसायिक आस्थापनांसमोर ग्राहक आपली वाहने मुख्य रस्त्यावरच उभी करतात. परिणामी आधीच अरुंद झालेला रस्ता अधिकच संकुचित होऊन वाहतुकीचा पूर्णतः बोजवारा उडतो.
अपघाताची वाट पाहत आहे का प्रशासन?
लाखो रुपयांचा सार्वजनिक निधी खर्च करून उभारलेली यंत्रणा जर सुरूच होत नसेल, तर त्या खर्चाचे औचित्य काय, असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत. वाहतूक कोंडी, वाढता अपघाताचा धोका आणि नागरिकांची होणारी रोजची फरफट पाहता, प्रशासन एखादी मोठी दुर्घटना घडण्याची वाट पाहत आहे काय? अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिकांमधून उमटत आहे.
आष्टीकरांची एकच मागणी आहे — “सिग्नल केवळ उभारू नका, ते तात्काळ सुरू करा आणि शहराला वाहतूक कोंडीच्या विळख्यातून मुक्त करा.” प्रशासनाने याची त्वरित दखल घेऊन नागरिकांच्या संयमाचा अंत पाहू नये, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.








