मुक्ताईनगर तालुक्यातील अवकाळी पावसामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ मदतीची मागणी; शिवसेनेकडून तहसीलदारांना निवेदन
जळगाव उप संपादक | प्रणित काठोके
मुक्ताईनगर तालुक्यात १ जून रोजी झालेल्या अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्यामुळे शेतकरी, व्यापारी व सर्वसामान्य नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे तालुकाप्रमुख अॅड. राहुल अशोक पाटील यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदार यांना निवेदन देऊन नुकसानग्रस्तांना तात्काळ आर्थिक मदत देण्याची मागणी करण्यात आली.
निवेदनात म्हटले आहे की, अचानक आलेल्या वादळी पावसामुळे अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांचे मोठे नुकसान झाले असून काही ठिकाणी झाडे उन्मळून पडली आहेत. तसेच घरांचे, गोठ्यांचे व इतर मालमत्तेचेही नुकसान झाले आहे. त्यामुळे प्रभावित नागरिकांना तातडीने मदत मिळणे आवश्यक असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
शिवसेनेने प्रशासनाकडे नुकसानग्रस्त भागांचे पंचनामे तात्काळ करण्याची मागणी केली असून कृषी व महसूल विभागाने संयुक्त पाहणी करून शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी केली आहे. तसेच पीक विमा योजनेंतर्गत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना लवकरात लवकर लाभ मिळवून देण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
यावेळी संबंधित अधिकाऱ्यांनी निवेदन स्वीकारून शासनाच्या नियमांनुसार पुढील कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.








