मुक्ताईनगर तालुक्यामध्ये कर्जाच्या आमिषाने लाखोंची फसवणूक; दोन आरोपी अटकेत
प्रतिनिधी | प्रणित काठोके
कर्ज मिळवून देण्याच्या नावाखाली लाखो रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला असून या प्रकरणात पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींपैकी एक जळगाव येथील तर दुसरा भुसावळ येथील असल्याची माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार शेतकरी व्यवसाय करत असून त्यांनी कर्जासाठी अर्ज केला होता. याच दरम्यान फायनान्स कंपनीचे प्रतिनिधी असल्याचे सांगत काही व्यक्तींनी तक्रारदाराशी संपर्क साधला. कर्ज मंजूर करून देण्यासाठी आवश्यक कागदपत्रे गोळा करत त्यांनी टप्प्याटप्प्याने विविध कारणांखाली पैसे जमा करण्यास सांगितले.
संशयितांनी प्रोसेसिंग फी, इन्शुरन्स, स्टॅम्प ड्युटी आदी कारणांखाली ऑनलाइन पद्धतीने रक्कम मागितली. तक्रारदाराने विश्वास ठेवून वेगवेगळ्या खात्यांमध्ये पैसे जमा केले. मात्र, पैसे भरल्यानंतरही कर्जाची रक्कम मिळाली नाही. उलट आणखी पैशांची मागणी करण्यात आली.
दरम्यान, तक्रारदाराला बनावट कर्ज मंजुरी पत्र आणि चेकचे फोटो पाठवण्यात आले. त्यामुळे संशय निर्माण झाल्याने त्यांनी संबंधितांकडे चौकशी केली असता समाधानकारक उत्तर मिळाले नाही. अखेर फसवणूक झाल्याची खात्री झाल्यानंतर त्यांनी मुक्ताईनगर पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली.
या प्रकरणात पोलिसांनी तातडीने कारवाई करत दोन आरोपींना अटक केली असून पुढील तपास सुरू आहे. नागरिकांनी अशा प्रकारच्या कर्जाच्या आमिषाला बळी पडू नये, कोणतीही आर्थिक व्यवहार करण्यापूर्वी संबंधित कंपनीची खातरजमा करावी, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.








