दुःखाच्या काळात आधाराचा हात; गडचिरोली जिल्हा संगणक परिचालक संघटनेचा माणुसकीचा प्रेरणादायी उपक्रम
श्री मनोज उराडे गडचिरोली, प्रतिनिधी :
संघटना म्हणजे केवळ हक्कांसाठी लढणारी यंत्रणा नसून संकटसमयी आपल्या सदस्यांच्या कुटुंबासाठी आधारवड ठरणारे एक मोठे कुटुंब असते, याची प्रचिती महाराष्ट्र राज्य संगणक परिचालक संघटना, गडचिरोली जिल्ह्याने पुन्हा एकदा आपल्या कार्यातून दिली आहे. गेल्या दशकभरापासून संघटना निधन झालेल्या तसेच अपघातग्रस्त संगणक परिचालकांच्या कुटुंबांना आर्थिक मदतीचा हात देत सामाजिक बांधिलकीचे अनोखे उदाहरण निर्माण करत आहे. गडचिरोली जिल्ह्यातील संगणक परिचालकांची एकजूट, परस्परांबद्दलची आत्मीयता आणि संघटनेविषयीची निष्ठा यामुळे ही संघटना आज एका मोठ्या कुटुंबात परिवर्तित झाली आहे. एखाद्या सदस्यावर दुःखाचा डोंगर कोसळला की संपूर्ण संघटना त्याच्या कुटुंबाच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहते. त्यामुळे अनेक कुटुंबांना कठीण काळात आर्थिक तसेच मानसिक आधार मिळाला आहे.
अनाथ झालेल्या सियाच्या भविष्यासाठी २ लाखांची सुरक्षित तरतूद
एप्रिल महिन्यात ग्रामपंचायत अनखोडा येथील संगणक परिचालक गौतम मेश्राम आणि त्यांच्या पत्नीचे दुर्दैवी अपघातात निधन झाले. या हृदयद्रावक घटनेत त्यांची अवघी पाच वर्षांची मुलगी कु. सिया बचावली; मात्र तिच्या डोक्यावरून आई-वडिलांचे छत्र हरपले. या दुःखद प्रसंगात संघटनेने संवेदनशीलतेची आणि सामाजिक जबाबदारीची जाणीव ठेवत पुढाकार घेतला. सियाच्या शिक्षण व भविष्यासाठी तिच्या नावाने २ लाख रुपयांची एलआयसीमध्ये गुंतवणूक करण्यात आली. संघटनेच्या या निर्णयाचे सर्व स्तरांतून स्वागत होत असून, मानवतेचा आदर्श म्हणून त्याकडे पाहिले जात आहे.
स्व. टोकेश सहाडे यांच्या कुटुंबालाही संघटनेचा आधार
ग्रामपंचायत दवंडी, ता. कोरची येथील संगणक परिचालक स्व. टोकेश सहाडे यांचे एप्रिल महिन्यात दुःखद निधन झाले. त्यांच्या कुटुंबावर आलेल्या संकटाच्या काळात संघटनेने तत्काळ मदतीचा हात पुढे केला.
दि. ३० मे २०२६ रोजी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या निवासस्थानी भेट देऊन परिवाराला ५१ हजारांचा सानुग्रह मदतनिधी प्रदान केला. यावेळी राज्य उपाध्यक्ष मुकेश नामेवार, जिल्हाध्यक्ष संदीप बुरमवार, जिल्हा उपाध्यक्ष विकेश उंदीरवाडे, जिल्हा सचिव आशिष कंठीवार, जिल्हा संघटक राधेश्याम बावणे, धानोरा तालुका अध्यक्ष उमेश वासनिक, तालुका उपाध्यक्ष शिवाजी काटकेलवार तसेच कोरची तालुक्यातील संगणक परिचालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आजवर लाखोंची मदत; अनेक कुटुंबांना दिलासा
गेल्या १० ते १२ वर्षांत संघटनेने अनेक दिवंगत संगणक परिचालकांच्या कुटुंबांना सानुग्रह मदतनिधी प्रदान केला आहे. राजेश तोरे-40000₹, कैलास भोयर-51000, सुरेश घरपट्टी-50000₹, माणिक बरडे-40000₹, इंद्रभान मडावी-50000₹, जितू कुमरे-50000₹, विलास चौधरी-50000₹, रामसेवक बंजार-67000₹, अविनाश भणारे-50000₹, गौतम मेश्राम-230000₹ आणि टोकेश सहाडे- 51000₹ यांच्या कुटुंबांना विविध स्वरूपात आर्थिक मदत देण्यात आली आहे.
तसेच अपघातग्रस्त संगणक परिचालक महेश रायपुरे यांनाही 72 हजारांची आर्थिक मदत करून संघटनेने संकटात धावून जाण्याची आपली परंपरा कायम राखली आहे.
महामेळाव्यातून एकजुटीचा संदेश
संघटनेने सामाजिक उपक्रम आणि गरजू सदस्यांना आर्थिक मदत देण्याची परंपरा अधिक सक्षम करण्यासाठी १२ मार्च २०२६ रोजी जिल्हास्तरीय महामेळाव्याचे आयोजन केले होते. या महामेळाव्यात संघटित राहण्याचे, परस्पर सहकार्य वाढविण्याचे आणि सामाजिक उत्तरदायित्व जपण्याचे आवाहन करण्यात आले.
‘एकजुटीतूनच माणुसकी जिवंत राहते’
आजच्या स्पर्धात्मक आणि स्वार्थी वातावरणात एखाद्या कुटुंबावर दुःखाचा प्रसंग ओढवल्यानंतर त्यांच्यासोबत खंबीरपणे उभे राहणे हीच खरी सामाजिक बांधिलकी आहे. महाराष्ट्र राज्य संगणक परिचालक संघटना, गडचिरोली जिल्हा हे कार्य सातत्याने करत असून संघटनेने जपलेली माणुसकी, सहकार्याची भावना आणि सामाजिक उत्तरदायित्व निश्चितच इतरांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.
दुःखाच्या अंधारात आशेचा किरण बनून अनेक कुटुंबांना दिलासा देणाऱ्या या उपक्रमामुळे “संघटना म्हणजे केवळ हक्कांसाठीचा लढा नव्हे, तर संकटात कुटुंबाप्रमाणे उभे राहण्याची भावना” हा संदेश पुन्हा अधोरेखित झाला आहे. गडचिरोली जिल्हा संगणक परिचालक संघटनेचे हे कार्य समाजात माणुसकीची ज्योत तेवत ठेवणारे आणि अनेकांसाठी आदर्श ठरणारे आहे.








