अधिकमासा निमित्त पुरुषोत्तमाच्या दर्शनास येणाऱ्या भक्तांच्या सोयी सुविधेसाठी मंदिराचे विश्वस्त सज्ज
माजलगाव सखाराम कुलकर्णी
माजलगाव तालुक्यातील पुरुषोत्तम पुरी येथे भारतातील पुरुषोत्तमाचे एकमेव मंदिर असून अधिक मासात पुरुषोत्तमाच्या दर्शनाचे अनन्य महात्म असते .म्हणून दर्शनास भारतातून लाखो ने भक्त येत असून भक्तांच्या सोयी सुविधा साठी पुरुषोत्तमाच्या मंदिर ट्रस्टचे विश्वस्तांकडून योग्य नियोजन होत आहे .
बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यात पुरुषोत्तम पुरी येथे भारतातील भगवान पुरुषोत्तमाचे एकमेव मंदिर आहे. पुरुषोत्तम पुरी हे गाव जवळपास 3 हजार लोक वस्तीचे असून गोदावरी नदीच्या काठी आहे .तेराव्या शतकात राजा रामदेवराय यांनी पुरुषोत्तमाचे हेमाडपंथी मंदिराचे बांधकाम केले होते. पण आता त्या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात येत आहे. आता तेथे भव्यदिव्य मंदिराची उभारणी होत आहे .पुरुषोत्तम देवस्थान समितीचे अध्यक्ष विजय गोळेकर उपाध्यक्ष दिगंबर कोरडे तर सचिव बाबासाहेब गोळेकर हे आहेत. यांनी शासनाकडून मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी ५४ कोटी २६ लाख रुपयाचा निधी मंजूर करून घेतला .त्यातून मंदिराच्या बांधकामास सुरुवात झाली. पुरुषोत्तम हा भगवान विष्णूचा अवतार मानला जातो .दर तीन वर्षांनी येणाऱ्या अधिक मासात पुरुषोत्तमाच्या दर्शनाचे महात्म असल्याने या गावास वेगळे महत्त्व प्राप्त झाले. भगवान पुरुषोत्तमाची मूर्ती काळ्यापाषाणात पूर्वाभिमुख आहे. या मंदिराची विशेषतः म्हणजे वरद विनायक गणपतीची चार फूट उंचीची मूर्ती, माता पार्वतीच्या पादुका आणि सहा लक्षेश्वर शंकराची शिवपिंड असा त्रिवेणी संगम एकाच मंदिरात येथे असून इतर दुसरीकडे शोधूनही सापडत नाही. अधिक मासात संपूर्ण महिनाभर भारतातील विविध भागातून ३०ते ४० लाख भाविक दर्शनास येत असतात. रोज सरासरी एक लाख भक्त दर्शनासाठी येतात. भक्तांची कोणतीच गैरसोय होऊ नये दर्शन सुलभ व्हावे याची मंदिर विश्वस्तांनी खबरदारी घेतली. गाडी पार्किंगची व्यवस्था मंदिरापासून जवळच एक किलोमीटर अंतरावर केली ,दर्शन लाईन मध्ये भक्तांना ऊन लागू नये म्हणून पत्र्याचे शेड उभे केले. व लाईन मध्ये गर्मी होऊ नये म्हणून १२ कुलर तसेच १८फॅन बसवलेले आहेत.पिण्यास शुद्ध फिटर पाण्याची व्यवस्था मंदिर विश्वस्तांनी केली. त्यामुळे दर्शनासाठी लाईन मध्ये चार ते पाच तास उभे राहावे लागले तरी भक्तांना त्रास होणार नाही याची काळजी घेऊन विश्वस्तांनी सर्व सुविधा केलेल्या आहेत. दि. १७ मे पासून अधिक मासास सुरुवात झाली असून पहिल्या दिवसापासून भक्तांची रीघ लागलेली आहे. रोज भक्तांची गर्दी वाढत आहे. दर्शनाच्या लाईन बारीवर विश्वस्तांनी बारकाईने लक्ष ठेवले असून दर्शनासाठी घुसखोरी झालेली दिसून येत नाही. सर्व सुविधामुळे मंदिराचे अध्यक्ष विजय गोळेकर सचिव बाबासाहेब गोळेकर उपाध्यक्ष दिगंबर कोरडे यांचे सह सर्व विश्वस्तांचे भक्तांकडून कौतुक होत आहे. या सोयीसुविधांचे भक्तांना दर्शनाचा लाभ शांततेत घेता येत आहे.








