शास्त्री फार्मसी महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिवस उत्साहात साजरा
विशेष प्रतिनिधी …स्वप्निल पाटील एरंडोल
पळासदळ (ता. एरंडोल) — शास्त्री फार्मसी महाविद्यालयात दि. 15 ऑक्टोबर रोजी वाचन प्रेरणा दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. हा दिवस भारताचे माजी राष्ट्रपती व ‘मिसाइल मॅन ऑफ इंडिया’ डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी साजरा केला जातो. विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी व त्यांना वाचनाचे महत्त्व पटवून द्यावे, यासाठी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजय शास्त्री यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना वाचनाचे दैनंदिन जीवनातील महत्त्व अधोरेखित केले. त्यांनी डॉ. कलाम यांच्या विचारांचा संदर्भ देत विद्यार्थ्यांना प्रेरणादायी संदेश दिला. उपप्राचार्य डॉ. पराग कुलकर्णी यांनी वाचनाचे विविध प्रकार व त्यातून होणाऱ्या व्यक्तिमत्व विकासावर सविस्तर चर्चा केली.
या विशेष दिनानिमित्त विद्यार्थ्यांसाठी “वाचन व पुस्तक चर्चा” या थीमवर विचार मंथन तसेच पुस्तक प्रदर्शन आयोजित करण्यात आले. विद्यार्थ्यांनी या उपक्रमात उत्साहाने सहभाग घेतला आणि पुस्तकांच्या महत्त्वावर आपले विचार मांडले.
कार्यक्रमाच्या समारोपाला विद्यार्थ्यांना वाचनाची आवड वाढवण्यासाठी प्रोत्साहनपर प्रमाणपत्रे देण्यात आली. महाविद्यालयात आगामी काळात वाचनाशी निगडित विविध उपक्रम राबविण्याचा संकल्पही यावेळी करण्यात आला.
या संपूर्ण कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन महाविद्यालयाच्या ग्रंथालय विभाग प्रमुख सौ. मीना मोरे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. मंगेश पाटील आणि आभार प्रदर्शन प्रा. जावेद शेख यांनी मांडले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.








