मराठा प्रवाह समन्वय समितीच्या सदस्यांनी शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त रायगडावर राबविले विविध उपक्रम.
प्रतिनिधी: गोपाळ भालेराव
परभणी:चलो रायगड या अभियाना अंतर्गत मराठा प्रवाह समन्वय समितीच्या वतीने ४ ते ६ जून यादरम्यान पर्यावरण जागृती अभियान, प्लास्टिक मुक्त रायगड किल्ला, बीज रोपण, शिवरायांचे विचार काळाची गरज असे उपक्रम राबविण्यात आले. या शिवराज्याभिषेक सोहळ्यात संघटनेतील सदस्यांनी सहभाग नोंदविला, यात महिलांनीही सहभाग घेतला होता.
सोहळ्यानिमित्त चलो रायगड या अभियाना अंतर्गत परभणी ते रायगड किल्ला या दरम्यान विविध उपक्रम दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मराठा प्रवाह समन्वय समितीच्या वतीने ४ जून ते ६ जून या दरम्यान आयोजन करण्यात आले होते. या अभियानात शिवमुद्रा संघटना व अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने हा कार्यक्रम राबविण्यात आला.
पर्यावरण जागृती अभियान अंतर्गत वृक्ष लागवड व पाणी आडवा पाणी जिरवा या संदर्भाचे मार्गदर्शन धाराजी भुसारे यांनी ४ जून रोजी परभणीत आयोजित कार्यक्रमातून केले. जिल्ह्यातून सुरुवात करण्यात आली. ५ जून रोजी प्लास्टिक मुक्त रायगड व विविध फळांच्या बीज रोपणाचा कार्यक्रम रायगड किल्ल्याच्या परिसरात संदीप गव्हाणे गंगासागर भुसारे वैशाली जाधव यांच्या पुढाकारातून करण्यात आला. ६ जून रोजी रक्तदान शिबिरात सहभाग नोंदवत रक्तदान करण्यात आले.
याप्रसंगी ‘शिवरायांचे विचार हे आजच्या काळाची गरज’ या
संदर्भात चौक सभेत मार्गदर्शन कार्यक्रम गजानन देशमुख सूर्यकांत मोगल अंकुश पोंढे, राधाताई गव्हाणे यांच्या परिश्रमातून संपन्न झाला. भविष्यात इतिहासाचे साक्षीदार (प्रत्यक्षात किल्ला भेट) हा ऐतिहासिक कार्यक्रम मराठा प्रवाह समन्वय समितीच्या वतीने आयोजित करण्यात येणार आहे. या कार्यक्रमात जास्तीत जास्त शिवप्रेमी बांधवांनी सहभाग नोंदवावा, असे आवाहन घाराजी भुसारे यांनी केले आहे.








