जुन्या कात्रज बोगद्यातील खून प्रकरणाचा उलगडा; चार आरोपी जेरबंद, गावठी पिस्तूलासह काडतुसे जप्त
अजिंक्य महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी अशोक पाचुंदकर
भोर, ता. २० जुलै : राजगड पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे शिंदेवाडी (ता. भोर, जि. पुणे) येथील जुन्या कात्रज बोगद्याजवळ ११ जुलै रोजी झालेल्या खून प्रकरणाचा पुणे ग्रामीण पोलिसांनी यशस्वी उलगडा करत चार आरोपींना अटक केली आहे. या कारवाईदरम्यान एका आरोपीकडून गावठी पिस्तूल व तीन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत.
मृत संजय बाबुराव कडू देशमुख (वय ४०) यांची धारदार शस्त्राने वार करून हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी राजगड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे शाखा व राजगड पोलीस स्टेशनच्या संयुक्त पथकाकडे सोपविण्यात आला.
तपासादरम्यान पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक विश्लेषण, प्रत्यक्षदर्शींची माहिती आणि गुप्त बातमीदारांच्या मदतीने मंथन दिनेश वैद्य, सौरभ सागर परदेशी, मियान गफ्फारुद्दीन शेख व संदीप बाबुलाल कोरी या चार आरोपींना अटक केली. चौकशीत जुन्या वैमनस्यातून व सूडाच्या भावनेतून हा खून केल्याची कबुली आरोपींनी दिली.
अटक करण्यात आलेल्या संदीप बाबुलाल कोरी याच्याकडून एक गावठी पिस्तूल व तीन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली. याप्रकरणी त्याच्याविरुद्ध शस्त्र कायद्यान्वये स्वतंत्र गुन्हाही दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्रसिंह गौर, पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर (स्थानिक गुन्हे शाखा), पोलीस निरीक्षक संतोष जाधव (राजगड पोलीस स्टेशन), सहायक पोलीस निरीक्षक चेतन माळवे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या तपासात स्थानिक गुन्हे शाखा व राजगड पोलीस स्टेशनच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी उल्लेखनीय कामगिरी बजावली








