प्रतिनिधी: संतोष लांडे.
पुणे – नाना पेठेतील मच्छी मार्केटमध्ये व्यवसाय करणाऱ्या मासेविक्रेत्याकडून खंडणी मागितल्याप्रकरणी कुख्यात आंदेकर टोळी अडचणीत आली आहे. टोळीचा प्रमुख शिवम आंदेकर याला फरासखाना पोलिसांनी अटक केली असून, त्याच्यासह पाच ते सहा साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पीडित ३८ वर्षीय मासेविक्रेत्याने दिलेल्या माहितीनुसार, त्याचा मासे विक्रीचा स्टॉल नाना पेठेतील मच्छी मार्केटमध्ये आहे. गेल्या तीन महिन्यांपासून शिवम आंदेकर आणि त्याचे साथीदार दरमहा ५० हजार रुपये खंडणीची मागणी करत होते. पैसे न दिल्यास स्टॉल बंद पाडण्याची तसेच जीवे मारण्याची धमकीही दिली जात होती.
या त्रासाला कंटाळून अखेर पीडिताने पोलिसांकडे तक्रार दाखल केली. त्यावरून फरासखाना पोलीस ठाण्यात शिवम आंदेकरसह इतरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, आंदेकरला अटक करण्यात आली आहे. उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे.
पोलीस तपास सुरूच
फरासखाना पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आंदेकरला अटक केली असून, टोळीतील इतर सदस्यांच्या शोधासाठी विशेष पथके तयार करण्यात आली आहेत. मासेविक्रेत्यांकडून संगनमताने पैसे उकळण्याचा प्रकार गंभीर मानला जात असून, या प्रकरणामागे आणखी कोणी गुन्हेगारी टोळी सक्रिय आहे का, याचाही तपास सुरू आहे.
आंदेकर टोळीचा गुन्हेगारी इतिहास
शिवम आंदेकर याचे नाव यापूर्वीही काही किरकोळ गुन्ह्यांमध्ये आले असून, त्याच्या टोळीची स्थानिक पातळीवर दहशत आहे, अशी माहिती पोलिस सूत्रांनी दिली. या घटनेमुळे मच्छी मार्केटमधील इतर विक्रेत्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.
पुढील तपास फरासखाना पोलीस करत आहेत.








