प्रतिनिधी – सारंग महाजन | अहिल्यानगर
५ जूनच्या जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने ‘प्लास्टिक प्रदूषणाचा अंत’ ही संकल्पना समोर ठेवत स्नेहबंध सोशल फाउंडेशनने “कॅरीबॅगशी नाते तोडा, पर्यावरणाशी नाते जोडा” या घोषवाक्याखाली प्लास्टिकमुक्ती अभियानाची घोषणा केली आहे.
या अभियानाचा पोस्टर अनावरण सोहळा आमदार संग्राम जगताप, जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, छावणी परिषद सीईओ विक्रांत मोरे आणि उपवनसंरक्षक धर्मवीर सालविठ्ठल यांच्या उपस्थितीत पार पडला.
स्नेहबंधचे अध्यक्ष डॉ. उद्धव शिंदे यांनी सांगितले, “प्लास्टिकमुळे केवळ मानवी आरोग्यच नव्हे, तर संपूर्ण जैविक साखळीवर परिणाम होत आहे. प्लास्टिकचे विघटन शेकडो वर्षे घेत असल्याने पर्यावरणाला दीर्घकालीन धोका निर्माण झाला आहे.”
ते पुढे म्हणाले, “जगभरात पुनर्प्रक्रियेविषयी विविध प्रयोग होत असले तरी अजूनही प्लास्टिक मुक्तीसाठी सामाजिक आणि वैयक्तिक स्तरावर प्रयत्नांची गरज आहे. राज्य शासनही यासाठी विविध उपक्रम राबवत आहे. त्यामुळे आपण सर्वांनी प्लास्टिक पिशव्या वापरणं थांबवून पर्यावरण पूरक जीवनशैली अंगीकारण्याचा संकल्प करायला हवा.”










