महावितरण’च्या विद्युत सुरक्षा सप्ताहाचा जागर:
कुंचले आणि शब्दांतून विजेचा ‘सुरक्षित’ मंत्र
प्रतिनिधी सतीश कडून नागपूर
नागपूर, दि. 4 जून 2025: महावितरणच्या 20 व्या वर्धापनदिनानिमित्त सध्या सुरू असलेल्या ‘विद्युत सुरक्षा सप्ताहा’ ने नागपूर आणि वर्धा जिल्ह्यात जोरदार जनजागृतीची लाट आणली आहे. विजेच्या सुरक्षित वापराबाबत नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करणे हा या सप्ताहाचा मुख्य उद्देश असून, यासाठी विशेषतः शालेय विद्यार्थ्यांसह कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी आयोजित करण्यात आलेल्या निबंध आणि चित्रकला स्पर्धांना प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे.
महावितरणच्या नागपूर परिमंडळाने हा विद्युत सुरक्षा सप्ताह अत्यंत कल्पकतेने आयोजित केला आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना विद्युत सुरक्षेचे महत्त्व समजावून देण्यासाठी विविध माध्यमांचा वापर केला जात आहे, ज्यात ‘निबंध आणि चित्रकला’ स्पर्धा आकर्षण ठरल्या आहेत.
स्पर्धेत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी विजेच्या सुरक्षित वापराच्या विविध पैलूंवर आपल्या शब्दांतून प्रभावीपणे प्रकाश टाकला. विजेचा वापर करताना घ्यावयाची खबरदारी, शॉर्ट सर्किट टाळण्याचे उपाय, विजेच्या धक्क्यापासून स्वतःचे संरक्षण कसे करावे, तसेच घराबाहेर व शेतात विजेच्या तारांपासून सुरक्षित कसे राहावे, यांसारख्या विषयांवर विद्यार्थ्यांनी माहितीपूर्ण आणि विचारप्रवर्तक निबंध सादर केले. या निबंधांमधून त्यांची विद्युत सुरक्षेबाबतची सखोल माहिती आणि चिंतनशीलता स्पष्टपणे दिसून आली, ज्यामुळे विजेच्या बाबतीत होणारी छोटीशी निष्काळजी किती जीवघेणी ठरू शकते, याचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले.
चित्रकला स्पर्धेनेही विद्युत सुरक्षेचा संदेश कलात्मकपणे घराघरात पोहोचवला. चिमुकल्या कलाकारांनी आपल्या कल्पनाशक्तीला रंग आणि कुंचल्यांची जोड देत विजेच्या तारांना स्पर्श न करणे, तुटलेल्या तारांपासून दूर राहणे, ओल्या हातांनी स्विचला स्पर्श न करणे, आणि विद्युत उपकरणांची नियमित तपासणी करणे यांसारख्या सुरक्षा नियमांना चित्रांद्वारे प्रभावीपणे मांडले. त्यांच्या बोलक्या चित्रांमधून विद्युत सुरक्षेचे महत्त्व आणि त्यावरील प्रतिबंधात्मक उपाययोजना सहजपणे समजत होत्या, ज्यामुळे सुरक्षा संदेश अधिक आकर्षक आणि कायम लक्षात राहणारा बनला.
महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या उपक्रमांचे कौतुक करताना सांगितले, “निबंध आणि चित्रकलेच्या माध्यमातून विद्युत सुरक्षेचा पाठ शिकवणे हा अत्यंत प्रभावी मार्ग आहे. विशेषतः लहान वयातच मुलांना विजेच्या धोक्यांबद्दल आणि सुरक्षिततेच्या उपायांबद्दल माहिती मिळाल्यास भविष्यात अनेक जीवघेणे अपघात टाळता येतील. ही मुलेच उद्याचे जबाबदार नागरिक असल्याने त्यांच्यात ही जागरूकता रुजणे अत्यंत महत्त्वाचे आहे.” स्पर्धेतील विजेत्यांना आकर्षक बक्षिसे देऊन प्रोत्साहन देण्यात आले, ज्यामुळे इतर विद्यार्थ्यांनाही अशा विधायक उपक्रमांमध्ये सहभागी होण्याची प्रेरणा मिळेल.
नागपूर शहर मंडल, वाडी, हिंगणा, त्रिमुर्तीनगर, ब्राह्मणी, खापा, नरखेड, काटोल, कुही, भिवापूर, कोंढाळी, कळमेश्वर, उमरेड, कामठीसह जिल्ह्यातील अनेक ठिकाणी निबंध आणि चित्रकला स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. नागपूर जिल्ह्याप्रमाणेच वर्धा जिल्ह्यातही वर्धा, हिंगणघाट, सेलू, कारंजा, पुलगाव, आष्टी, खरांगणा, आर्वी येथेही विद्युत सुरक्षेबाबत निबंध आणि चित्रकला स्पर्धांचे आयोजन करण्यात आले
या विद्युत सुरक्षा सप्ताहादरम्यान, महावितरणचे अधिकारी विविध निवासी, वाणिज्यिक, बाजारपेठा आणि सार्वजनिक वाहतूक केंद्रांवर जाऊन नागरिकांमध्ये जनजागृती करत आहेत. माहितीपत्रके वाटून विद्युत सुरक्षेबाबत मोठ्या प्रमाणावर जनजागृती केली जात आहे. या उपक्रमांमुळे नागपूर आणि वर्धा जिल्ह्यातील नागरिकांमध्ये विद्युत सुरक्षेबाबत अधिक जागरूकता निर्माण होईल आणि विजेमुळे होणारे अपघात टाळण्यास निश्चितपणे मदत होईल, असा विश्वास महावितरणने व्यक्त केला आहे.
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त गुरुवारी (5जून) महावितरणतर्फे प्रत्येक विभागात सुरक्षा आणि पर्यावरण रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे, तर शुक्रवारी (6 जून) कार्यालयांमध्ये सुरक्षा प्रतिज्ञा समारंभाचे आयोजन करण्यात येणार आहे.
सोबत – छायाचित्रे
उपमुख्य जनसंपर्क अधिकारी,
महावितरण, नागपूर
