ॲड. शीतल चव्हाण फाउंडेशनचे ‘स्वच्छ उमरगा, हरीत उमरगा’ महाअभियान
*स्वातंत्र्यदिनापासून महिनाभर स्वच्छता-वृक्षारोपण; प्रभागनिहाय समस्यांची नोंद, जनजागृती, गांधीगिरीसह स्वच्छता व्यवस्थेतील अनियमिततेवरही लक्ष*
उमरगा : शहरातील कचरा, तुंबलेले नाले, चिखल, डुकरांचा व मोकाट कुत्र्यांचा उपद्रव, अनियमित कचरा संकलन आणि अपुऱ्या स्वच्छता व्यवस्थेच्या पार्श्वभूमीवर ॲड. शीतल चव्हाण फाउंडेशन, उमरगा यांच्या वतीने दि. 15 ऑगस्ट ते 15 सप्टेंबर 2026 या कालावधीत महिनाभर ‘स्वच्छ उमरगा, हरीत उमरगा’ महाअभियान राबविण्यात येणार आहे. स्वच्छता, वृक्षारोपण, घरोघरी जनजागृती, प्रभागनिहाय समस्यांचा पाठपुरावा, पथनाट्य, प्रभातफेरी, संत गाडगेबाबांच्या विचारांचा जागर आणि प्रशासनाच्या निष्क्रियतेविरोधात शांततामय ‘गांधीगिरी’ अशा विविध उपक्रमांचा यात समावेश आहे.
गेल्या काही महिन्यांत दि. 20 व 21 मे, 7 जून तसेच 12 ऑगस्ट रोजी शहरातील विविध भागांतील कचरा, सांडपाणी, तुंबलेले नाले, चिखल व डुकरांच्या उपद्रवाचे वास्तव GPS लोकेशन, तारीख व वेळेसह छायाचित्रांद्वारे प्रशासनासमोर मांडण्यात आले होते. दुसरीकडे स्वच्छतेसाठी पाहणी दौरे व उपाययोजनांच्या बातम्या प्रसिद्ध होत असल्या तरी त्याचे परिणाम प्रत्यक्ष रस्त्यावर दिसले पाहिजेत, अशी भूमिका फाउंडेशनने घेतली आहे. त्याचवेळी ‘शहर आपले आहे, तर जबाबदारीही आपलीच आहे’ या भावनेतून केवळ प्रश्न उपस्थित न करता नागरिकांनीही प्रत्यक्ष कृतीत उतरावे, या उद्देशाने अभियान हाती घेण्यात आले आहे.
अभियानात शहरभर पत्रके वाटून स्वच्छता व कचरा व्यवस्थापनाबाबत जनजागृती केली जाणार आहे. फाउंडेशनचे पदाधिकारी व स्वयंसेवक स्वतःच्या घराचा परिसर, गल्ली व परिसरातील रिकामे प्लॉट स्वच्छ करून ‘आधी सुरुवात स्वतःपासून’ हा संदेश देतील. त्यानंतर घरोघरी जाऊन नागरिकांना रस्ते, नाले व मोकळ्या जागांवर कचरा न टाकण्याचे आवाहन केले जाईल. दुकानदार, व्यापारी, हॉटेल व्यावसायिकांनाही योग्य कचरा व्यवस्थापनासाठी सहभागी करून घेतले जाणार आहे.
शहरातील प्रत्येक प्रभागातील कचऱ्याचे ढीग, तुंबलेले नाले, अनियमित घंटागाडी, साचलेले पाणी, डुकरे, मोकाट कुत्रे, चिखल व अस्वच्छ सार्वजनिक ठिकाणांची शक्य तेथे GPS लोकेशन व छायाचित्रांसह नोंद करून त्या समस्या संबंधित नगरसेवक, लोकप्रतिनिधी, नगर परिषद स्वच्छता विभाग, मुख्याधिकारी व संबंधित अधिकाऱ्यांना लेखी कळविण्यात येतील. त्यानंतरही योग्य कालावधीत कार्यवाही न झाल्यास संबंधित अधिकारी किंवा जबाबदार व्यक्तीला गुलाब पुष्प देऊन शांततामय ‘गांधीगिरी’ करण्यात येईल. ‘विरोध व्यक्तीला नव्हे, निष्क्रियतेला; आंदोलन शांततामय, मात्र पाठपुरावा सातत्यपूर्ण’ अशी फाउंडेशनची भूमिका आहे.
‘स्वच्छ उमरगा’सोबत ‘हरीत उमरगा’ या संकल्पनेतून शहरातील मोकळ्या व शासकीय जागा, कार्यालये, शाळा, महाविद्यालये आणि योग्य सार्वजनिक ठिकाणी आवश्यक परवानगीने वृक्षारोपण करण्यात येणार असून लावलेल्या वृक्षांच्या संवर्धनाची जबाबदारीही निश्चित केली जाणार आहे.
स्वच्छतेचा संदेश लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी पथनाट्य, प्रभातफेरी, घोषवाक्ये, पोस्टर, चित्रकला व इतर कलात्मक माध्यमांचा वापर केला जाणार आहे. विद्यार्थी व युवकांचा विशेष सहभाग घेतला जाईल. महाराष्ट्राला स्वच्छतेचा वस्तुपाठ देणाऱ्या संत गाडगेबाबांच्या विचारांचा जागर करण्यासाठी पदाधिकारी, स्वयंसेवक व विद्यार्थी त्यांच्या प्रेरणेतून प्रतीकात्मक वेशभूषा करून शहरात स्वच्छतेचे आवाहन करणार आहेत.
अभियानात शहराच्या स्वच्छता व्यवस्थेतील अनियमिततेचाही तथ्याधारित पाठपुरावा केला जाणार आहे. स्वच्छता कर्मचाऱ्यांना ठरल्याप्रमाणे योग्य व वेळेवर वेतन मिळते का, आवश्यक कर्मचारी प्रत्यक्ष कामावर आहेत का, स्वच्छता कंत्राटांची अंमलबजावणी नियमानुसार होते का, घंटागाड्या व अन्य वाहने नियोजित कामासाठी वापरली जातात का आणि स्वच्छतेवर खर्च होणाऱ्या सार्वजनिक निधीचा अपेक्षित परिणाम दिसतो का, याची उपलब्ध अधिकृत माहितीच्या आधारे वस्तुस्थिती समोर आणली जाणार आहे. गैरव्यवस्था, अनियमितता किंवा भ्रष्टाचाराच्या ठोस बाबी निदर्शनास आल्यास त्या कायदेशीर, पुराव्यानिशी व शांततामय मार्गाने प्रशासन आणि नागरिकांसमोर मांडल्या जातील.
एखादा नागरिक, गल्ली, सोसायटी, व्यापारी संघटना किंवा संस्था आपला परिसर स्वच्छ ठेवून आदर्श निर्माण करत असेल, तर त्यांचे कामही शहरासमोर आणून प्रोत्साहन दिले जाणार आहे.
‘कचऱ्यापासून स्वातंत्र्य, घाणीपासून स्वातंत्र्य, दुर्गंधीपासून स्वातंत्र्य, प्लास्टिकच्या विळख्यातून स्वातंत्र्य आणि निष्क्रियतेपासून स्वातंत्र्य’ असा संकल्प स्वातंत्र्यदिनापासून करण्याचे आवाहन फाउंडेशनने केले आहे.
या महिनाभराच्या अभियानात विद्यार्थी, युवक, महिला, ज्येष्ठ नागरिक, व्यापारी, सामाजिक संस्था, शाळा-महाविद्यालये, डॉक्टर, वकील, पत्रकार, शिक्षक आणि जागरूक नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन ॲड. शीतल चव्हाण फाउंडेशन, उमरगा यांनी केले आहे.








