गोपनीय माहितीच्या आधारे एलसीबीची कारवाई; १३ पुरुष व १० महिलांवर गुन्हा
उप संपादक प्रणित काठोके
मुक्ताईनगर तालुक्यातील घोडसगाव–चिखली गावाजवळ, बुलढाणा जिल्ह्याच्या सीमेवरील काही हॉटेलांच्या मागील परिसरात आणि शेतामध्ये काही पुरुष व महिला अश्लील कृत्ये करत असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेला (एलसीबी) मिळाली होती.
या माहितीच्या आधारे एलसीबीच्या पथकाने संबंधित ठिकाणी छापा टाकून कारवाई केली. या कारवाईत १३ पुरुष आणि १० महिलांवर महाराष्ट्र पोलीस कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. प्राथमिक माहितीनुसार, कारवाईतील सर्व महिला या राजस्थान राज्यातील असल्याचे पोलिसांनी सांगितले.
पोलिसांनी संबंधितांविरुद्ध मुंबई पोलीस कायदा कलम ११० आणि ११७ अंतर्गत कारवाई केली आहे. कलम ११० नुसार सार्वजनिक ठिकाणी अश्लील किंवा असभ्य वर्तन करण्यास मनाई असून, अशा प्रकारचे कृत्य करणाऱ्यांवर कारवाईची तरतूद आहे. तर कलम ११७ अंतर्गत या उल्लंघनाबद्दल दंड किंवा परिस्थितीनुसार कारावासाची शिक्षा होऊ शकते.
पीटा कायदा लागू का झाला नाही?
या प्रकरणात अनैतिक व्यापार (प्रतिबंध) कायदा, १९५६ (PITA Act) लागू करण्यात आलेला नाही. उपलब्ध माहितीनुसार, या प्रकरणात मानवी तस्करी, जबरदस्ती, कुंटणखाना चालविणे किंवा वेश्याव्यवसायासाठी सक्ती केल्याचे प्राथमिक पुरावे समोर आलेले नाहीत. त्यामुळे प्रौढ व्यक्तींमधील परस्पर संमतीच्या बाबींमध्ये पीटा कायद्याच्या तरतुदी आपोआप लागू होत नाहीत.
तथापि, या प्रकरणाचा अधिक तपास पोलिसांकडून सुरू असून, तपासादरम्यान नवीन पुरावे समोर आल्यास संबंधित कायद्यांनुसार पुढील कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.








