*एसटी प्रवास महागला! राज्य परिवहन प्राधिकरणाकडून १३.५६ टक्के भाडेवाढीस मंजुरी; १० टक्के हंगामी भाडेवाढ मागे
कार्यकारी संपादक किरण सोनवणे
डिझेल, सुटे भाग आणि देखभाल खर्चात वाढ; प्रवाशांना सुरक्षित व अखंड सेवा देण्यासाठी निर्णय
मुंबई, दि. १७ जुलै : राज्य परिवहन प्राधिकरणाने महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) भाडेवाढीच्या प्रस्तावाला मंजुरी दिली असून, एसटीच्या भाड्यात १३.५६ टक्के वाढ करण्यात आली आहे. मात्र, यापूर्वी लागू करण्यात आलेली १० टक्के हंगामी भाडेवाढ या निर्णयामुळे रद्द करण्यात आली आहे.
देशातील बदलत्या आर्थिक परिस्थितीमुळे डिझेलच्या वाढलेल्या किमती, वाहनांच्या सुट्या भागांचा खर्च, टायर तसेच देखभाल खर्चात झालेली वाढ यामुळे एसटी महामंडळावर मोठा आर्थिक ताण निर्माण झाला होता. या पार्श्वभूमीवर राज्यभरातील लाखो प्रवाशांना सुरक्षित, दर्जेदार आणि अखंड सेवा देण्यासाठी भाडेवाढीचा निर्णय घेण्यात आल्याचे महामंडळाने स्पष्ट केले आहे.
एसटी महामंडळाच्या आर्थिक शाश्वततेसाठी ही भाडेवाढ आवश्यक असल्याचे सांगण्यात आले असून, यामुळे प्रवाशांना अधिक सक्षम, सुरक्षित आणि विश्वासार्ह प्रवास सुविधा उपलब्ध करून देणे शक्य होणार आहे. तसेच, एसटी सेवेची गुणवत्ता टिकवून ठेवण्यास आणि भविष्यातील सेवा अधिक बळकट करण्यास या निर्णयाची मदत होणार असल्याचे महामंडळाने म्हटले आहे.
राज्यातील लाखो प्रवाशांच्या दैनंदिन जीवनाशी निगडित असलेल्या एसटी सेवेच्या सातत्यपूर्ण आणि गुणवत्तापूर्ण संचालनासाठी हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे.








