भोसरी : संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यानिमित्त श्री संत सेना महाराज मंदिर महिला मंडळाच्या वतीने पालखी मार्गावरील वारकरी व भाविकांसाठी फराळ व पिण्याच्या पाण्याचे वाटप करून सेवाभावाचा आदर्श उपक्रम राबविण्यात आला. “वारकरी सेवा हीच ईश्वरसेवा” या भावनेतून महिला मंडळाच्या सदस्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला.
या उपक्रमाचे नेतृत्व महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ. स्नेहा गायकवाड व उपाध्यक्षा सौ. मोहिनी उरकूटकर यांनी केले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली वारकऱ्यांना फराळ, बिस्किटे तसेच पिण्याच्या पाण्याच्या बाटल्यांचे वाटप करण्यात आले. वारकऱ्यांच्या सेवेसाठी महिला मंडळाच्या सदस्यांनी मोठ्या श्रद्धेने व समर्पण भावनेने कार्य केले.
या सेवाभावी उपक्रमामुळे पालखी सोहळ्याच्या भक्तिमय वातावरणात सामाजिक बांधिलकीचीही प्रचीती आली. उपस्थित वारकरी व भाविकांनी महिला मंडळाच्या या उपक्रमाचे कौतुक करत त्यांच्या कार्याला शुभेच्छा दिल्या. संत परंपरेचा वारसा जपत समाजसेवेचे व्रत जोपासणाऱ्या महिला मंडळाच्या कार्याचे सर्व स्तरांतून स्वागत होत आहे.








