आमदार एकनाथराव खडसे यांच्या प्रश्नानंतर सरकारचे स्पष्टीकरण; भडगाव हमीभाव केंद्रावरील लाठीमाराचा इन्कार, नियोजन सुधारण्यासाठी उपाययोजना जाहीर
उप संपादक | प्रणित काठोके
जळगाव जिल्ह्यातील भडगाव येथील शासकीय हमीभाव (MSP) खरेदी केंद्रावर नियोजनाअभावी शेतकऱ्यांची गैरसोय झाल्याचा मुद्दा विधानसभेत आमदार एकनाथराव खडसे यांनी उपस्थित केला. या प्रश्नाला उत्तर देताना अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण राज्यमंत्री छगन भुजबळ यांनी शासनाची भूमिका स्पष्ट केली.
आमदार खडसे यांनी ८ एप्रिल २०२६ रोजी ऑनलाइन धान्य नोंदणीसाठी मोठी गर्दी झाल्याने शेतकऱ्यांवर लाठीमार झाल्याचा आरोप केला होता. तसेच तीन शेतकरी जखमी झाल्याचा, पिण्याच्या पाण्याची व सावलीची व्यवस्था नसल्याने शेतकऱ्यांची गैरसोय झाल्याचा मुद्दा उपस्थित करत दोषींवर कारवाई व भविष्यातील उपाययोजनांची माहिती मागितली होती.
यावर उत्तर देताना मंत्री छगन भुजबळ यांनी भडगाव हमीभाव खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांवर लाठीमार झाल्याची घटना घडलेली नसल्याचे स्पष्ट केले. मात्र, ऑनलाइन नोंदणीसाठी झालेल्या गर्दीदरम्यान मंडपाचा पाईप कोसळून तीन शेतकरी जखमी झाल्याचे त्यांनी मान्य केले. जखमी शेतकऱ्यांना पोलिस प्रशासनाने तातडीने शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केल्याचेही त्यांनी सांगितले.
सरकारने दिलेल्या माहितीनुसार, संबंधित खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांसाठी निवारा, पिण्याचे पाणी व इतर मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. तसेच भविष्यात गर्दी टाळण्यासाठी उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, पोलीस निरीक्षक आणि शेतकरी सहकारी संघ यांच्या संयुक्त बैठकीत निर्णय घेऊन स्वतंत्र ऑनलाइन नोंदणी लिंक तयार करण्यात आली. या लिंकची व्यापक प्रसिद्धी करण्यात आल्याने शेतकऱ्यांनी घरबसल्या ऑनलाइन नोंदणी करण्यास सुरुवात केल्याची माहिती सरकारने सभागृहात दिली.
आमदार खडसे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नामुळे भडगाव येथील हमीभाव केंद्रावरील व्यवस्थापनाचा मुद्दा विधानसभेत चर्चेत आला असून, भविष्यात अशा प्रकारची गर्दी व गैरसोय टाळण्यासाठी प्रशासनाने आवश्यक सुधारणा करण्याचे आश्वासन दिले आहे.








