एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

धाराशिव नगरपरिषदेला १८ कोटींचा विशेष निधी; महायुतीतील दोन्ही पक्षांकडून श्रेय घेण्याची चढाओढ

धाराशिव नगरपरिषदेला १८ कोटींचा विशेष निधी; महायुतीतील दोन्ही पक्षांकडून श्रेय घेण्याची चढाओढ

धाराशिव | जिल्हा प्रतिनिधी लडलेसाब नदाफ.

धाराशिव नगरपरिषदेला राज्य शासनाच्या ‘वैशिष्ट्यपूर्ण योजना’ अंतर्गत १८ कोटी रुपयांचा विशेष निधी मंजूर झाल्यानंतर शहराच्या विकासाला मोठी चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. मात्र, निधी मंजूर होताच महायुतीतील शिवसेना (शिंदे गट) आणि भारतीय जनता पक्ष या दोन्ही पक्षांच्या पदाधिकाऱ्यांकडून या निधीचे श्रेय घेण्याची चढाओढ सुरू झाली आहे. दोन्ही पक्षांनी स्वतंत्र प्रसिद्धीपत्रके प्रसिद्ध करत विकासकामांमागील आपापल्या नेत्यांच्या प्रयत्नांचा उल्लेख केला आहे.
शिवसेना पदाधिकारी सोमनाथ गुरव यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या पाठपुराव्यामुळे जिल्ह्यातील विकासकामांवरील स्थगिती उठली असून, आता विविध प्रलंबित विकासकामांना वेग मिळत असल्याचा दावा केला आहे.
गुरव म्हणाले की, अनेक विकासकामे विविध कारणांमुळे रखडली होती. मात्र, स्थगिती उठल्यानंतर खासदार ओमराजे निंबाळकर यांनी संबंधित विभागांकडे सातत्याने पाठपुरावा करून विकासकामे मार्गी लावण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. त्यामुळे आगामी काळात धाराशिव शहरासह जिल्ह्यातील अनेक विकासकामे पूर्णत्वास जातील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यावेळी त्यांनी विरोधकांवर टीका करत, “काही जण पत्रके प्रसिद्ध करून विकासकामांचे श्रेय घेण्याचा किंवा इतरांचे अपयश दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र जनतेसमोर प्रत्यक्ष केलेले काम महत्त्वाचे असते, केवळ प्रसिद्धीपत्रके नव्हेत,” असा टोला लगावला.
दुसरीकडे, भाजपचे जिल्हा प्रवक्ते नितीन भोसले यांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रकात या निधीचे श्रेय महायुती सरकार, आमदार राणाजगजितसिंह पाटील आणि नगराध्यक्षा नेहा काकडे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला दिले आहे.
त्यांच्या माहितीनुसार, राज्य शासनाच्या नगरविकास विभागाने धाराशिव नगरपरिषदेसाठी १८ कोटी रुपयांचा विशेष निधी मंजूर केला असून, त्यामध्ये आठवडी बाजाराच्या विकासासाठी ८ कोटी रुपये, राजमाता जिजाऊ उद्यानासाठी ५ कोटी रुपये, छत्रपती संभाजी महाराज उद्यानासाठी ३ कोटी रुपये आणि हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे उद्यानासाठी २ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. या सर्व विकासकामांचा खर्च राज्य शासनाकडून १०० टक्के अनुदानाच्या स्वरूपात उपलब्ध करून दिला जाणार आहे.
नितीन भोसले यांनी सांगितले की, या निधीमुळे शहरातील नागरिकांना आधुनिक सुविधा उपलब्ध होतील. आठवडी बाजार अधिक सुसज्ज होईल, तर तीनही उद्यानांचे सुशोभीकरण होऊन नागरिकांना दर्जेदार विरंगुळ्याची ठिकाणे उपलब्ध होतील. महायुती सरकार धाराशिवच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असून, आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या माध्यमातून अनेक विकासकामांना गती मिळत असल्याचा दावाही त्यांनी केला.
दरम्यान, निधी मंजूर झाल्यानंतर शहराच्या विकासापेक्षा त्याचे श्रेय कोणाला मिळणार, यावरून महायुतीतील दोन्ही पक्षांमध्ये राजकीय चुरस रंगताना दिसत आहे. एकीकडे शिवसेना खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या पाठपुराव्याचा उल्लेख करत आहे, तर दुसरीकडे भाजप महायुती सरकार, आमदार राणाजगजितसिंह पाटील आणि नगराध्यक्षा नेहा काकडे यांच्या प्रयत्नांमुळे निधी मंजूर झाल्याचा दावा करत आहे.
विशेष म्हणजे, दोन्ही पक्ष विकासासाठी आपणच पुढाकार घेतल्याचे सांगत असले तरी, नागरिकांच्या दृष्टीने महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मंजूर झालेल्या १८ कोटी रुपयांच्या निधीतून विकासकामे किती जलद आणि दर्जेदार पद्धतीने पूर्ण होतात, हा असणार आहे. त्यामुळे आता श्रेयवादापेक्षा प्रत्यक्ष विकासकामांच्या अंमलबजावणीकडे धाराशिवकरांचे लक्ष लागले आहे.

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Ajinkya Maharashtra news
rudraraj production
Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

AI Tools Indexer
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link