आमदार एकनाथराव खडसे यांची नवापूर बर्ड फ्लूग्रस्तांना नुकसान भरपाईची मागणी; शासनाने दिली कारवाईची माहिती
उप संपादक | प्रणित काठोके
नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर शहर व परिसरात बर्ड फ्लू (H5N1) संसर्गामुळे झालेल्या मोठ्या नुकसानीचा मुद्दा आमदार एकनाथराव खडसे यांनी विधानसभेत उपस्थित करत बाधित शेतकरी, पोल्ट्री व्यावसायिक आणि कामगारांना नुकसान भरपाई देण्याची मागणी केली. या संदर्भात त्यांनी तारांकित प्रश्नाद्वारे शासनाकडे सविस्तर माहिती मागविली.
शासनाने सभागृहात दिलेल्या माहितीनुसार, बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव आढळल्यानंतर बाधित क्षेत्राच्या एक किलोमीटर परिसरात विशेष प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यात आल्या. या कारवाईत ४ लाखांहून अधिक कुक्कुट पक्षी नष्ट करण्यात आले. तसेच सुमारे २५ लाख अंडी आणि ५४८ टन पोल्ट्री खाद्य (फीड) नष्ट करून संसर्गाचा प्रसार रोखण्याचा प्रयत्न करण्यात आला.
प्रादुर्भावाच्या काळात नवापूर शहरातील चिकन विक्री केंद्रे, अंडी दुकाने तसेच बिर्याणी सेंटरसारखे संबंधित व्यवसायही काही काळासाठी बंद ठेवण्यात आले होते. त्यामुळे पोल्ट्री उद्योगाशी संबंधित अनेक व्यावसायिक आणि शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाल्याचे खडसे यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले.
यावर उत्तर देताना पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी सांगितले की, ‘प्राण्यांमधील संक्रामक व सांसर्गिक रोगास प्रतिबंध व नियंत्रण अधिनियम-२००९’ तसेच ‘राष्ट्रीय कृती आराखडा-२०२१’ अंतर्गत सर्व आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या. बाधित परिसरातील पक्षी, अंडी आणि खाद्य नष्ट करून संपूर्ण क्षेत्राचे निर्जंतुकीकरण करण्यात आले.
आरोग्य विभागामार्फत पोल्ट्री कर्मचारी आणि फ्रंटलाईन वर्कर्स यांच्या आरोग्य तपासण्या करण्यात आल्या होत्या. या तपासण्यांतील सर्व नमुने राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था (NIV), पुणे यांच्या अहवालानुसार निगेटिव्ह आढळले असल्याची माहितीही मंत्र्यांनी दिली.
नुकसान भरपाईबाबत बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, केंद्र शासनाच्या ‘पशु स्वास्थ्य व रोग नियंत्रण कार्यक्रम’ अंतर्गत ५० टक्के केंद्र शासन आणि ५० टक्के राज्य शासनाच्या सहभागातून भरपाई दिली जाते. केंद्र शासनाकडून निधी प्राप्त होताच पात्र शेतकरी व व्यावसायिकांना नियमानुसार नुकसान भरपाई अदा करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
बर्ड फ्लूमुळे प्रभावित झालेल्या नागरिकांना लवकरात लवकर आर्थिक दिलासा मिळावा, अशी अपेक्षा व्यक्त करत आमदार एकनाथराव खडसे यांनी शासनाने भरपाई प्रक्रिया गतीने पूर्ण करावी, अशी मागणी केली.








