पावसाळी अधिवेशनात आमदार प्रविण स्वामी यांचा शेतकरी प्रश्नांवर आक्रमक आवाज; कर्जमाफीपासून सिंचनापर्यंत सरकारला धारेवर धरले!
धाराशिव जिल्हा प्रतिनिधी:-लाडलेसाब नदाफ
दि.२४ मुंबई.पावसाळी अधिवेशनात उमरगा-लोहारा मतदारसंघाचे आमदार प्रविण स्वामी यांनी शेतकरी आणि ग्रामीण भागाशी संबंधित विविध प्रश्नांवर आक्रमक भूमिका घेत सरकारचे लक्ष वेधले. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीपासून ते वीजपुरवठा, सिंचन, कृषी उद्योग, वन्यप्राण्यांमुळे होणारे नुकसान आणि कृषी क्षेत्रातील विविध अडचणींचा मुद्दा त्यांनी सभागृहात प्रभावीपणे मांडला.
2019 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या कर्जमाफीची आणि सध्याच्या सरकारच्या कर्जमाफी निर्णयाची तुलना करत सध्याची कर्जमाफी अनेक शेतकऱ्यांना वंचित ठेवणारी असल्याचा आरोप त्यांनी केला. शेतकरी कर्जबाजारी होण्यामागील कारणांचा सखोल अभ्यास करून कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी त्यांनी केली.
शेतकऱ्यांना मुबलक आणि उच्च दाबाने वीजपुरवठा मिळावा, जळालेले ट्रान्सफॉर्मर 24 ते 48 तासांत बदलण्यात यावेत, कृषी फीडर स्वतंत्र करावेत तसेच घरगुती आणि कृषी वीजजोडण्या वेगवेगळ्या लाईनवर देण्यात याव्यात, अशी मागणी त्यांनी केली. सौर कृषी पंप योजनेची अंमलबजावणी वेळेत आणि काटेकोरपणे करण्याचाही मुद्दा त्यांनी उपस्थित केला.
व शेती मालाला योग्य बाजारभाव मिळत नसल्याचे सांगत बाजारभाव आणि हमीभावातील फरकाची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याची मागणी त्यांनी केली.
वन्यप्राण्यांमुळे होणाऱ्या शेती नुकसानीची भरपाई तातडीने मिळावी, मोबाईल ॲपद्वारे नुकसानीची नोंदणी, पंचनामे आणि अवघ्या पंधरा दिवसांत भरपाई देण्याची व्यवस्था उभारण्याची मागणीही त्यांनी केली.
मराठवाड्यात मोठ्या प्रमाणात सोयाबीन उत्पादन होत असल्याने प्रत्येक एमआयडीसी अथवा तालुकास्तरावर सोयाबीन प्रक्रिया उद्योग केंद्र उभारावेत, असे मत त्यांनी मांडले. शेतकरी आरोग्य सुरक्षा कार्ड आणि शेतकरी कुटुंबासाठी कॅशलेस आरोग्य योजना राबविण्याचीही मागणी केली.
युवाशेती उद्योजक योजना सुरू करून कृषी पदवीधारकांना बिनव्याजी कर्ज, स्टार्टअपसाठी प्रोत्साहन आणि आर्थिक मदत देण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली. बोगस बियाणे आणि खत निर्मिती व विक्री रोखण्यासाठी मकोका सारखा कठोर कायदा करण्याची मागणीही सभागृहात करण्यात आली.
लोहारा तालुक्यात AgriStack अंतर्गत फार्मर आयडी नोंदणीतील अडचणी दूर करण्याची मागणी करत शेतकऱ्यांना येणाऱ्या तांत्रिक समस्यांकडेही त्यांनी सरकारचे लक्ष वेधले.
सिंचनाच्या प्रश्नावर बोलताना माकणी निम्न तेरणा प्रकल्पाच्या डावा व उजवा कालव्यांची तातडीने दुरुस्ती करावी तसेच तुरोरी मध्यम प्रकल्पांतर्गत कोळसूर ते तुरोरी जोड कालव्याचे काम प्रभावीपणे पूर्ण करून शेतकऱ्यांना सिंचनाचा लाभ मिळवून द्यावा, अशी मागणी आमदार प्रविण स्वामी यांनी केली.








