डोंबिवलीत पोलिसांचा मोठा धडाका! २४ नायजेरियन नागरिक ताब्यात
प्रतिनिधी मुकुंद मोरे
खोणी परिसरातील पलावा सिटी येथे डोंबिवली आणि नवी मुंबई पोलिसांनी संयुक्त शोध मोहीम राबवत २४ नायजेरियन नागरिकांना ताब्यात घेतले. या कारवाईत १४ पुरुष, ६ महिला आणि ४ मुलांचा समावेश असून, प्राथमिक तपासात ८ जणांकडे भारतात वास्तव्य करण्यासाठी आवश्यक असलेली वैध कागदपत्रे नसल्याचे उघड झाले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ताब्यात घेतलेल्या व्यक्तींमधील ९ जणांवर यापूर्वी विविध गुन्ह्यांची नोंद असून त्यांची अधिक चौकशी सुरू आहे. अमली पदार्थांशी संबंधित प्रकरणांच्या पार्श्वभूमीवर ही विशेष मोहीम हाती घेण्यात आली होती.
दरम्यान, पोलिसांची कारवाई सुरू असताना एका नायजेरियन महिलेने चौथ्या मजल्यावरून उडी मारल्याची धक्कादायक घटना घडली. गंभीर जखमी झालेल्या महिलेवर तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिची प्रकृती वैद्यकीय देखरेखीखाली आहे.
या मोहिमेनंतर बेकायदेशीररीत्या वास्तव्य करणाऱ्या परदेशी नागरिकांना घरे भाड्याने देणाऱ्या घरमालकांनाही पोलिसांनी इशारा दिला आहे. भाडेकरूंची संपूर्ण पडताळणी न करता निवास उपलब्ध करून देणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
पलावा परिसरातील या मोठ्या कारवाईमुळे अवैध वास्तव्य, अमली पदार्थांचे जाळे आणि परदेशी नागरिकांच्या हालचालींबाबत नव्याने चर्चा सुरू झाली असून पोलिसांचा तपास अधिक वेगाने पुढे सुरू आहे.








