देशातील पहिला ‘जिल्हा विकास आणि हवामान कृती आराखडा’ रत्नागिरी जिल्ह्यासाठी प्रकाशित
प्रतिनिधी मुकुंद मोरे
रत्नागिरी जिल्ह्याच्या शाश्वत आणि हवामान-लवचिक विकासासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलत देशातील पहिला ‘जिल्हा विकास आणि हवामान कृती आराखडा’ प्रकाशित आला. iFOREST इंटरनॅशनल फोरम फॉर एन्व्हायर्नमेंट, सस्टेनेबिलिटी अँड टेक्नॉलॉजी आणि महाराष्ट्र शासन यांच्या पर्यावरण व हवामान बदल विभागाच्या पुढाकाराने हा व्यापक रोडमॅप तयार करण्यात आला आहे. जिल्हा विकास नियोजनात हवामान बदलाच्या कृतींचा समावेश करणारा हा देशातील पहिलाच पथदर्शी आराखडा आहे.
जिल्हा नियोजन समिती सभागृहात झालेल्या कार्यक्रमात जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांच्या हस्ते आराखड्याचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी ‘जस्ट ट्रान्झिशन अँड क्लायमेट चेंज’ विभागाच्या संचालक श्रेष्ठा बॅनर्जी, iFOREST च्या वरिष्ठ संशोधिका डॉ. सिंधूजा कास्थला उपस्थित होत्या. राज्य वातावरणीय कृती कक्षाचे संचालक अभिजित घोरपडे दूरदृश्यप्रणालीद्वारे सहभागी झाले.
सौर ऊर्जेवर शासकीय इमारतींचा मानस
जिल्हाधिकारी जिंदल यांनी सांगितले की, सह्याद्री पर्वतरांगांच्या पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्रात असलेल्या किनारपट्टी जिल्हा म्हणून रत्नागिरीला हवामान बदलाच्या जोखमींसाठी सज्ज राहणे गरजेचे आहे. जिल्हा नियोजन समिती निधीतून सर्व शासकीय इमारती सौर ऊर्जेवर करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला.
हवामान बदलाचे संभाव्य परिणाम
अहवालानुसार, शतकाच्या मध्यापर्यंत रत्नागिरीचे तापमान २.३ ते ३.३ अंश सेल्सिअसने वाढण्याची शक्यता आहे. अतिवृष्टीमुळे २०५० पर्यंत सुमारे एक तृतीयांश गावे पूरप्रवण क्षेत्रात येऊ शकतात. जिल्ह्यातील सुमारे १६७ गावे भूस्खलन प्रवण क्षेत्रात असून, वाढत्या समुद्रपातळीमुळे किनारी भागातील मासेमारी वस्त्या व पायाभूत सुविधांना धोका संभवतो.
रत्नागिरीची अर्थव्यवस्था हापूस आंबा, काजू, भातशेती, मत्स्यव्यवसाय आणि पर्यटनावर आधारित आहे. त्यामुळे हवामान बदलाचा थेट परिणाम स्थानिक उपजीविकेवर होण्याची शक्यता आहे.
आराखड्याच्या प्रमुख शिफारसी
हवामान-लवचिक शेतीसाठी सूक्ष्मसिंचन व काढणी पश्चात सुविधा वाढवणे
१९ गिगावॅट सौर व पवन ऊर्जेच्या क्षमतेचा वापर
सौर पंप व सौर-आधारित कोल्ड चेन उभारणी
रस्ते, पूल व शासकीय इमारतींचे ‘क्लायमेट प्रूफिंग’
तरुणांसाठी ग्रीन स्किल्स प्रशिक्षण
आराखड्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी ‘जिल्हा हवामान कक्ष’ आणि ‘जिल्हा हवामान वित्तमंच’ स्थापन करण्याची शिफारस करण्यात आली आहे.
हा एकात्मिक आराखडा हवामान कृती आणि विकास यांना परस्परपूरक मानून रत्नागिरीच्या शाश्वत आणि सुरक्षित भविष्यासाठी दिशादर्शक ठरणार आहे.








