जयेश मेस्त्री यांना महाराष्ट्र शासनाचा यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कार जाहीर
प्रतिनिधी विकास वायाळ
मुंबई: मराठी साहित्य क्षेत्रातील प्रतिष्ठेचा मानला जाणारा स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कार २०२४ ची घोषणा झाली असून, यावर्षी एकूण ३५ साहित्यिकांना विविध वाङ्मय प्रकारांत सन्मानित करण्यात येणार आहे. या पुरस्कारांमध्ये बाल वाङ्मय विभागातील अत्यंत महत्त्वाचा मानला जाणारा ‘भा. रा. भागवत पुरस्कार’ प्रसिद्ध लेखक जयेश मेस्त्री यांच्या ‘जादूचा दिवा’ या बालनाट्य पुस्तकाला जाहीर झाला आहे. या सन्मानामुळे मराठी बालसाहित्यात मेस्त्री यांच्या योगदानाला अधिकृत मान्यता मिळाली आहे.
महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभागाने जाहीर केलेल्या या पुरस्कारांचे स्वरूप रोख रक्कम, स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र असे आहे. प्रौढ वाङ्मय व बृहन्महाराष्ट्र पुरस्कारांसाठी प्रत्येकी १ लाख रुपये, तर बाल व प्रथम प्रकाशन विभागासाठी प्रत्येकी ५० हजार रुपये अशी रक्कम प्रदान करण्यात येते. जयेश मेस्त्री यांना मिळालेल्या ‘भा. रा. भागवत पुरस्कारा’ अंतर्गत त्यांना ५० हजार रुपये रोख रक्कम, स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात येणार आहे.
या महत्त्वपूर्ण पुरस्काराचे वितरण २७ फेब्रुवारी २०२६ रोजी नाशिक येथे आयोजित एका भव्य समारंभात करण्यात येणार आहे. या सोहळ्यात अनेक मान्यवर साहित्यिक, कलावंत आणि शासकीय अधिकारी उपस्थित राहणार आहेत.
या सन्मानाबद्दल आपले मनोगत व्यक्त करताना जयेश मेस्त्री अत्यंत भावूक झाले. ते म्हणाले, “माझ्या ‘जादूचा दिवा’ या बालनाट्य पुस्तकाला महाराष्ट्र राज्य शासन स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कार (बाल वाङ्मय भा. रा. भागवत पुरस्कार) जाहीर झाला आहे. ही माझ्यासाठी अत्यंत आनंदाची आणि अभिमानाची बाब आहे. भा. रा. भागवत यांच्यासारख्या महान साहित्यिकाच्या नावाने पुरस्कार मिळाल्याने माझी जबाबदारी आणखी वाढली आहे. मी यापुढे आणखी चांगल्या प्रकारे रंगमंच व रसिकांची सेवा करण्याचा प्रयत्न करेन. माझ्या २० वर्षांच्या लेखन कार्याचा हा सन्मान आहे. व्यास पब्लिकेशनचे आणि मला लिहिते करणाऱ्या सर्वांचे मी मनःपूर्वक आभार मानतो. माझ्या प्रत्येक लेखनाचे पहिले वाचक व समीक्षक असलेल्या माझ्या पत्नी व चिरंजीव यांचेही मी आभार व्यक्त करतो.”
मेस्त्री पुढे म्हणाले, “हा पुरस्कार मी माझ्या प्रत्येक शुभचिंतकाला, मार्गदर्शकांना, रसिकांना आणि माझ्यावर प्रेम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला अर्पण करतो. हे माझे नाही, हे सर्व सरस्वती मातेचे आहे.” त्यांच्या या विनम्र आणि कृतज्ञतापूर्ण भावनांनी अनेकांची मने जिंकली आहे. जयेश मेस्त्री यांच्या या यशाबद्दल साहित्य वर्तुळातून त्यांचे अभिनंदन होत असून, त्यांच्या पुढील साहित्य प्रवासासाठी त्यांना हार्दिक शुभेच्छा देण्यात येत आहेत. हा पुरस्कार त्यांच्या बालनाट्य क्षेत्रातील अथक परिश्रमाचे आणि प्रतिभेचे प्रतीक आहे.








