ड्रंक हिट अँड रननंतर एर्टिगाची दगडफेक करून तोडफोड; चालकाला मारहाण, अज्ञात ५ ते ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
पिरंगुट (प्रतिनिधी – प्रकाश कांबळे):
पिरंगुट येथील घोटावडे फाटा परिसरात रविवारी (५ जुलै) मध्यरात्री ड्रंक हिट अँड रनची धक्कादायक घटना घडली. दारूच्या नशेत असलेल्या अज्ञात ५ ते ६ जणांनी दोन वाहनांच्या अपघातानंतर Maruti Suzuki Ertiga या कारची दगडफेक करून तोडफोड केली तसेच चालकाला मारहाण केल्याची घटना घडली. या प्रकरणी अज्ञात आरोपींविरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पौडहून पिरंगुटच्या दिशेने येणारी Maruti Suzuki Eeco (MH 14 ZC 9430) ही गाडी भरे रोडमार्गे घोटावडे फाट्याकडे येणाऱ्या Maruti Suzuki Ertiga या कारला जोरदार धडकली. अपघातानंतर वाहनातील व्यक्तींनी एर्टिगा गाडीवर दगडफेक करून काचा फोडल्या, वाहनाची मोठ्या प्रमाणात तोडफोड केली तसेच चालकाला मारहाण केली.
घटनेनंतर परिसरात मोठी गर्दी झाली. नागरिकांनी आरडाओरडा केल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पसार झाले. जमावातील एका नागरिकाने तातडीने 112 या आपत्कालीन क्रमांकावर संपर्क साधला. त्यानंतर पिरंगुट पोलीस चौकीतील कर्तव्यावर असलेले पोलीस कॉन्स्टेबल विशाल काठोळे आणि पोलीस कॉन्स्टेबल पठाण यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. प्राथमिक माहितीनुसार, कारचे सुमारे १ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.
दरम्यान, चालकाने पिरंगुट पोलीस चौकीत तक्रार दाखल केली असून पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे. परिसरातील पुरावे व उपलब्ध माहितीच्या आधारे आरोपींचा शोध घेण्यात येत आहे.
विशेष बाब म्हणजे घोटावडे फाटा हा अत्यंत वर्दळीचा आणि मध्यवर्ती चौक असतानाही तेथे एकही CCTV कॅमेरा नसल्याची बाब समोर आली आहे. स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, गेल्या एका महिन्यात या परिसरातील ही तिसरी गंभीर घटना असून वाढत्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे घोटावडे फाटा येथे तातडीने सीसीटीव्ही यंत्रणा बसवून पोलिस गस्त वाढवावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी प्रशासनाकडे केली आहे.









