दुचाकीवरून दारूची खुलेआम वाहतूक; पोलिसांच्या भूमिकेवर नागरिकांचे प्रश्नचिन्ह?
उगवा ते दहीहंडा परिसरात अवैध देशी दारूचा धुमाकूळ! दुचाकीवरून खुलेआम वाहतूक; पोलिसांच्या दुर्लक्षाचा नागरिकांचा आरोप
दहीहंडा / अकोट | प्रतिनिधी मंगेश लताड
अकोट तालुक्यातील उगवा येथून दहीहंडा आणि लगतच्या परिसरात अवैध देशी दारूची वाहतूक आणि विक्री सर्रास सुरू असल्याचा गंभीर प्रकार समोर येत आहे.
दुचाकीवरून मोठ्या प्रमाणात देशी दारूची वाहतूक केली जात असल्याचे निदर्शनास येत असून, या प्रकारामुळे परिसरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून हा अवैध व्यवसाय सुरू असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून केला जात आहे. विशेष म्हणजे, दुचाकीवरून दारूचा साठा ने-आण करून परिसरात विक्री केली जात असल्याची चर्चा असून, या बेकायदेशीर व्यवहारांवर नियंत्रण ठेवण्याचे आव्हान पोलीस प्रशासनासमोर उभे राहिले आहे.
या प्रकाराकडे स्थानिक पोलीस प्रशासन आणि अकोट फाईल पोलीस ठाण्याचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. अवैध दारू विक्रीमुळे सामाजिक शांतता आणि कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे.
पोलीस प्रशासन कारवाई करणार का?
अवैध देशी दारूची वाहतूक आणि विक्री करणाऱ्यांचा शोध घेऊन संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, तसेच या व्यवसायामागील सूत्रधारांचाही तपास करावा, अशी मागणी स्थानिक रहिवाशांकडून होत आहे.
आता उगवा-दहीहंडा परिसरातील या कथित अवैध दारू व्यवसायाची पोलीस प्रशासन दखल घेणार का? की नागरिकांच्या तक्रारींकडे असेच दुर्लक्ष होणार? याकडे संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे.







