सेवानिवृत्त ज्येष्ठ पत्रकारांना दरमहा एक लाख रुपये पेन्शन द्या!; ‘
सीनिअर जर्नालिस्ट असोसिएशन’ची पंतप्रधान मोदींकडे जोरदार मागणी
प्रतिनिधी राकेश गावडे
राष्ट्रीय पेन्शन पंचायतीसमोरही मांडला प्रश्न; पत्रकारांसाठी स्वतंत्र वैधानिक कल्याण विकास महामंडळ स्थापन करण्याची मागणी
पुणे, दि. २३ नोव्हेंबर : देशातील सेवानिवृत्त ज्येष्ठ पत्रकार आणि पत्रकारेतर कर्मचाऱ्यांना दरमहा प्रत्येकी एक लाख रुपये पेन्शन देण्यात यावी, अशी महत्त्वपूर्ण मागणी ‘सीनिअर जर्नालिस्ट असोसिएशन’ने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. यासोबतच ज्येष्ठ पत्रकारांच्या आर्थिक, आरोग्यविषयक आणि सामाजिक समस्या सोडविण्यासाठी केंद्र अथवा राज्य स्तरावर स्वतंत्र वैधानिक पत्रकार कल्याण विकास महामंडळ स्थापन करण्याची मागणीही करण्यात आली आहे.
नवी दिल्ली येथे लवकरच होणाऱ्या राष्ट्रीय पेन्शन पंचायतीच्या पार्श्वभूमीवर असोसिएशनने हा प्रश्न उपस्थित केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच राष्ट्रीय पेन्शन पंचायतीकडे लेखी निवेदन पाठवून पत्रकारांच्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यात आले आहे.
‘सीनिअर जर्नालिस्ट असोसिएशन’ ही धर्मादाय विश्वस्त नोंदणीकृत संस्था असून २०२३ पासून महाराष्ट्रासह देशातील विविध राज्यांत कार्यरत आहे. निवृत्त ज्येष्ठ पत्रकार, पत्रकारेतर कर्मचारी तसेच इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल ऑनलाइन माध्यमांमध्ये कार्य केलेल्या ज्येष्ठांच्या प्रश्नांवर संस्था काम करीत आहे. महागाईच्या वाढत्या झळांमुळे निवृत्त पत्रकारांचे आर्थिक जीवन अत्यंत कठीण झाले असून त्यांना सन्मानाने जगण्यासाठी ठोस आर्थिक मदतीची आवश्यकता असल्याचे संस्थेने निवेदनात नमूद केले आहे.
देशातील असंघटित पत्रकार, ग्रामीण पत्रकार आणि पत्रकारेतर कर्मचारी गेल्या अनेक दशकांपासून उपेक्षित राहिले आहेत. लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून पत्रकारितेचा गौरव केला जात असला, तरी प्रत्यक्षात पत्रकारांच्या आर्थिक सुरक्षिततेचा आणि सामाजिक सन्मानाचा प्रश्न अद्यापही प्रलंबित आहे. आरोग्य सुविधा, आर्थिक मदत आणि सार्वजनिक सेवांपासून अनेक ज्येष्ठ पत्रकार वंचित असल्याची खंतही असोसिएशनने व्यक्त केली आहे.
दरम्यान, अलिबाग येथील सांबरी येथे नुकत्याच झालेल्या सीनिअर जर्नालिस्ट असोसिएशनच्या महा मेळाव्यात पत्रकारांच्या विविध प्रश्नांवर महत्त्वपूर्ण ठराव मंजूर करण्यात आले. यामध्ये सेवानिवृत्त व ज्येष्ठ पत्रकारांना दरमहा एक लाख रुपये पेन्शन, सर्व पत्रकारांना विनाअट अधिस्वीकृती पत्रिका, पत्रकारांचे आर्थिक, सामाजिक व आरोग्यविषयक प्रश्न सोडविण्यासाठी कायमस्वरूपी वैधानिक विकास महामंडळ आणि राष्ट्रीय स्तरावर महिला, पुरुष, ग्रामीण पत्रकार तसेच पत्रकारेतर कर्मचाऱ्यांची निश्चित संख्या ठरविणे, या प्रमुख मागण्यांचा समावेश आहे.
या मागण्यांसाठी पंतप्रधान कार्यालय, केंद्रीय श्रम मंत्रालय, माहिती व प्रसारण मंत्रालय, राष्ट्रीय पेन्शन पंचायत तसेच महाराष्ट्र शासनाचे मुख्य सचिव आणि माहिती व जनसंपर्क महासंचालनालय यांच्याकडेही निवेदने सादर करण्यात आली आहेत.
या निवेदनावर संस्थेचे विश्वस्त व राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. जयपाल पाटील, विश्वस्त व राष्ट्रीय उपाध्यक्ष मिलिंद वैद्य, संस्थापक विश्वस्त व राष्ट्रीय सरचिटणीस संजयकुमार जोशी आणि संस्थापक विश्वस्त व माजी अध्यक्ष डॉ. राम अग्रवाल यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
पत्रकारितेच्या माध्यमातून आयुष्यभर लोकशाहीचा आवाज बुलंद करणाऱ्या ज्येष्ठ पत्रकारांना निवृत्तीनंतर सन्मानाने जगता यावे, यासाठी सरकारने त्यांच्या मागण्यांचा गांभीर्याने विचार करून ठोस निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा असोसिएशनने व्यक्त केली आहे.







