राक्षेवाडी घरफोडी प्रकरणाचा उलगडा; ४ लाख ९५ हजारांचे सोने-चांदीचे दागिने जप्त
प्रतिनिधी अशोक पाचुंदकर
राक्षेवाडी येथील घरफोडीचा उलगडा; ४ लाख ९५ हजार ६५० रुपयांचे सोने-चांदीचे दागिने जप्त
खेड पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाची यशस्वी कामगिरी; आरोपी साहिल भांबुरे व विधीसंघर्षग्रस्त बालक ताब्यात
खेड, दि. १६ ऑक्टोबर २०२६ : राक्षेवाडी येथे झालेल्या घरफोडीच्या गुन्ह्याचा उलगडा करण्यात खेड पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाला यश आले आहे. या प्रकरणात साहिल भांबुरे याच्यासह एका विधीसंघर्षग्रस्त बालकाचा सहभाग निष्पन्न झाला असून, त्यांच्याकडून चोरीस गेलेले सुमारे ४ लाख ९५ हजार ६५० रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत.
घराचा दरवाजा तोडून दागिन्यांची चोरी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. १ सप्टेंबर २०२६ रोजी राक्षेवाडी येथील साई योग अपार्टमेंटमध्ये राहणारे फिर्यादी निलेश बापू जांभळे (वय ३९) यांच्या घराचा दरवाजा तोडून अज्ञात व्यक्तीने घरात प्रवेश केला. त्यानंतर कपाटातील सोन्या-चांदीचे दागिने, अंदाजे ४ लाख ९५ हजार ६५० रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला होता.
या घटनेप्रकरणी खेड पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ५३२/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०५(अ) व ३३१(३) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक इस्माईल तांबोळी करीत होते.
सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपास
खेड पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक सुभाष चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे अन्वेषण पथकाने तपास सुरू केला. घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे तपासाची चक्रे वेगाने फिरविण्यात आली. या तपासातून सदर गुन्हा साहिल भांबुरे व एका विधीसंघर्षग्रस्त बालकाने केल्याचे निष्पन्न झाले.
त्यानंतर संबंधित बालकाला कायदेशीर प्रक्रियेचे पालन करून ताब्यात घेण्यात आले. तपासादरम्यान चोरीस गेलेले सोन्या-चांदीचे दागिने हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले.
असा आहे हस्तगत केलेला मुद्देमाल
या कारवाईत सोन्याचे गंठण, कानातील दागिने, चेन, अंगठ्या तसेच चांदीचे दागिने असा एकूण ४ लाख ९५ हजार ६५० रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई
ही कामगिरी पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल, अपर पोलीस अधीक्षक डॉ. शुभम कुमार, खेड विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल मांढवे यांच्या मार्गदर्शनाखाली खेड पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक सुभाष चव्हाण, सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन राऊळ, पोलीस उपनिरीक्षक इस्माईल तांबोळी, पोलीस हवालदार संतोष घोलप, पोलीस अंमलदार महेश गोसावी, सूरज राक्षे व संकेत कवडे यांनी केली.
खेड पोलिसांच्या या कामगिरीमुळे घरफोडीच्या गुन्ह्याचा उलगडा होऊन चोरीस गेलेला लाखो रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात यश आले आहे.







