एलसीबी जळगावचा पहाटे धडक छापा; बेकायदेशीर गोवंश कत्तलीच्या दोन ठिकाणांवर मोठी कारवाई
उप संपादक | प्रणित काठोके
स्थानिक गुन्हे शाखा (एलसीबी) जळगावने शुक्रवारी पहाटे राबविलेल्या नियोजनबद्ध धडक कारवाईत बेकायदेशीर गोवंश कत्तलीच्या कथित रॅकेटला मोठा धक्का दिला. पारधीवाडा व जपान जिन परिसरातील दोन ठिकाणी एकाच वेळी छापे टाकत पोलिसांनी मोठ्या प्रमाणात गोवंशाचे मांस, कत्तलीसाठी वापरण्यात येणारी हत्यारे व साहित्य जप्त केले. तसेच तीन जिवंत बैलांची सुटका करून त्यांना सुरक्षित गोशाळेत पाठविण्यात आले.
ही विशेष कारवाई सकाळी ६ ते दुपारी १२ या कालावधीत करण्यात आली. कारवाईदरम्यान घटनास्थळावरून ११ जणांना ताब्यात घेण्यात आले असून ६ संशयित आरोपी पसार झाले आहेत. फरार आरोपींचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
कारवाईत विविध वयोगटातील गोवंशाचे सुमारे १,५७५ किलो मांस जप्त करण्यात आले असून त्याची अंदाजित किंमत ३ लाख १५ हजार रुपये आहे. तसेच चार लोखंडी कुऱ्हाडी, नऊ लोखंडी सुऱ्या, सहा लोखंडी कोयते, दोन वजन काटे व इतर साहित्य जप्त करण्यात आले. कत्तलखान्यातून जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाची किंमत ३ लाख १८ हजार रुपये इतकी आहे.
याशिवाय जपान जिन परिसरातील पत्र्याच्या शेडमधून १२ ते १६ वर्षे वयोगटातील तीन पांढऱ्या रंगाचे गावरान बैल जिवंत अवस्थेत आढळून आले. या जनावरांची अंदाजित किंमत १ लाख ५५ हजार रुपये असून त्यांना सुरक्षितरित्या गोशाळेत हलविण्यात आले. एकूण जप्त मुद्देमाल व जनावरांची किंमत ४ लाख ७३ हजार रुपये इतकी आहे.
कारवाईदरम्यान पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. संदेश वाठोरे यांना घटनास्थळी पाचारण करण्यात आले. त्यांच्या उपस्थितीत गोवंशाच्या मांसाचे रासायनिक विश्लेषणासाठी (C.A.) नमुने सीलबंद करण्यात आले. उर्वरित मांस अमळनेर नगर परिषदेच्या मदतीने पंचांसमक्ष खड्डा खोदून नष्ट करण्यात आले.
या प्रकरणी ताब्यात घेतलेल्या आरोपींसह फरार संशयितांविरुद्ध संबंधित कायद्यांनुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास स्थानिक गुन्हे शाखेकडून करण्यात येत आहे.








