मुंबई, दि. १६ : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) प्रवासी सेवांमध्ये अधिक पारदर्शकता, सुरक्षितता आणि डिजिटल व्यवहारांना चालना देण्यासाठी १ ऑगस्ट २०२६ पासून महिला, ज्येष्ठ नागरिक आणि अमृत ज्येष्ठ नागरिक प्रवाशांसाठी NCMC (National Common Mobility Card) स्मार्ट कार्ड बंधनकारक करण्यात येणार असल्याची माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली आहे.
राज्यभर NCMC स्मार्ट कार्ड नोंदणी आणि वितरण मोहिमेला मोठा प्रतिसाद मिळत असून आतापर्यंत सुमारे ५१ लाख नागरिकांनी नोंदणी केली आहे. त्यापैकी जवळपास २९ लाख स्मार्ट कार्ड कार्यान्वित करण्यात आले आहेत. उर्वरित लाभार्थ्यांची कार्डेही लवकरच सुरू करण्यात येणार असल्याने संबंधितांनी विलंब न करता नोंदणी प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी आणि कार्ड वितरण प्रक्रिया अधिक सुलभ करण्यासाठी राज्यभरात ४ हजारांहून अधिक NCMC स्मार्ट कार्ड वितरण केंद्रे कार्यरत आहेत. ग्रामीण तसेच शहरी भागातील नागरिकांना सहजपणे कार्ड उपलब्ध व्हावे यासाठी ही केंद्रे सातत्याने सेवा देत आहेत.
दरम्यान, NCMC स्मार्ट कार्ड वितरण प्रक्रियेत कोणत्याही प्रकारचा गैरव्यवहार खपवून घेतला जाणार नसल्याचा इशारा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिला आहे. निर्धारित शुल्कापेक्षा अधिक रक्कम आकारणाऱ्या वितरण केंद्रांवर कठोर कारवाई करण्यात येणार असून संबंधित केंद्रांचा परवाना रद्द करण्याची कार्यवाहीही केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
महिला, ज्येष्ठ नागरिक आणि अमृत ज्येष्ठ नागरिकांना शासनाच्या विविध प्रवासी सवलतींचा लाभ पारदर्शक पद्धतीने मिळावा, तिकीट वितरण प्रक्रियेत सुधारणा व्हावी आणि प्रवास व्यवस्था अधिक आधुनिक बनावी, या उद्देशाने NCMC स्मार्ट कार्ड प्रणाली राबविण्यात येत आहे.
या निर्णयामुळे राज्य परिवहन व्यवस्थेच्या डिजिटल परिवर्तनाला गती मिळणार असून आगामी काळात अधिकाधिक प्रवासी या स्मार्ट प्रणालीशी जोडले जाणार आहेत. संबंधित लाभार्थ्यांनी १ ऑगस्टपूर्वी आपले NCMC स्मार्ट कार्ड प्राप्त करून ते कार्यान्वित करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.








