बँक ऑफ महाराष्ट्र, संगमवाडी शाखेतील गैरकारभाराबाबत नागरिकांची तक्रार
पुणे : बँक ऑफ महाराष्ट्रच्या संगमवाडी शाखेमध्ये गेल्या काही महिन्यांपासून ग्राहकांना विविध अडचणींचा सामना करावा लागत असल्याची तक्रार समोर आली आहे. शाखेतील अधिकारी पंकज कुमार हे गेल्या तीन महिन्यांपासून नियमितपणे बँकेत उपस्थित राहत नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. त्यामुळे ग्राहकांची अनेक कामे प्रलंबित राहत असून सर्वसामान्य नागरिकांना वारंवार हेलपाटे मारावे लागत आहेत.
तसेच शाखेतील पासबुक प्रिंटिंग मशीन मागील दोन दिवसांपासून बंद असल्याने ग्राहकांना त्यांच्या खात्याच्या व्यवहारांची माहिती मिळविण्यास अडचणी येत आहेत. खाते उघडण्यासाठी उपलब्ध असलेले अर्ज केवळ इंग्रजी भाषेत असल्याने ग्रामीण व मराठी भाषिक नागरिकांना खाते उघडताना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. संबंधित अर्ज मराठी भाषेतही उपलब्ध करून देण्याची मागणी ग्राहकांकडून होत आहे.
याशिवाय शाखेतील अनेक कर्मचारी व अधिकारी ग्राहकांशी मराठी भाषेत संवाद साधत नसल्याचीही तक्रार आहे. त्यामुळे मराठी भाषिक ग्राहकांना आवश्यक माहिती समजून घेण्यात अडचणी निर्माण होत असून त्यांची गैरसोय होत आहे.
या सर्व बाबींची वरिष्ठ बँक अधिकाऱ्यांनी तातडीने दखल घेऊन चौकशी करावी तसेच ग्राहकांना होत असलेला त्रास दूर करण्यासाठी योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी पोलीस मित्र सीमाताई वाघमारे तसेच क्राईम रिपोर्टर अशोक पाचुंदकर यांनी केली आहे.
– अशोक पाचुंदकर
क्राईम रिपोर्टर, पुणे.








