घाटकोपर हत्या प्रकरण: जुन्या वादातून इसमाचा खून; सिद्धेश कांबळेवर संशयाची सुई
प्रतिनिधी रणजीत मस्के
(घाटकोपर): घाटकोपर पश्चिम येथील गुरु नानक नगर परिसरात एका ४७ वर्षीय व्यक्तीची निर्घृण हत्या झाल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. कुलदीपसिंग भट्टी असे मृत व्यक्तीचे नाव असून, त्यांच्या पत्नीने सिद्धेश कांबळे याच्यावर हत्येचा संशय व्यक्त करत पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.
नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, कुलदीपसिंग भट्टी हे फर्निचरचे काम करायचे. मात्र, गेल्या काही काळापासून त्यांना दारूचे व्यसन जडल्याने त्यांच्या कौटुंबिक जीवनात तणाव निर्माण झाला होता. पतीच्या त्रासाला कंटाळून त्यांची पत्नी श्रीमती लताशा भट्टी या मुलासह स्वतंत्र राहत होत्या. तरीही पती-पत्नीमध्ये अधून-मधून भेट व्हायची.
२६ एप्रिल २०२६ रोजी सकाळी, गुरु नानक नगर येथील बस स्टॉपच्या मागील फुटपाथवर असलेल्या सिमेंटच्या बाकड्यावर कुलदीपसिंग यांचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात आढळून आला. त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती.
भांडणातून हत्येचा संशय
श्रीमती लताशा भट्टी यांनी दिलेल्या जबाबानुसार, २४ एप्रिल रोजी कुलदीपसिंग यांचे सिद्धेश कांबळे नावाच्या व्यक्तीचे काका राजू कांबळे यांच्याशी मोठे भांडण झाले होते. याच वादाचा राग मनात धरून सिद्धेश कांबळे कुलदीपसिंग यांना शोधत होता.
प्रत्यक्षदर्शी सलमान शफिक याने दिलेल्या माहितीनुसार, २५ एप्रिल रोजी दुपारी सिद्धेश कांबळे आपल्या काही साथीदारांसह कुलदीपसिंग यांना मारण्यासाठी शोधत होता. तसेच २६ एप्रिलच्या मध्यरात्री सुद्धा सिद्धेशने कुलदीपसिंग यांच्याबद्दल विचारणा केली होती. सकाळी ७ च्या सुमारास सिद्धेशने बाकड्यावर पडलेल्या कुलदीपसिंग यांच्या नाकाला हात लावून ते जिवंत आहेत की नाही, हे तपासात असल्याचेही सलमानने पाहिले.
पोलिस कारवाई
घाटकोपर पोलिसांनी याप्रकरणी भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १०३ (१) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. कुलदीपसिंग यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी राजावाडी रुग्णालयात पाठवण्यात आला असून, पोलीस सध्या सिद्धेश कांबळे याचा शोध घेत आहेत.
या घटनेमुळे गुरु नानक नगर परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून, पोलीस पुढील तपास करत आहेत.








