AcSIR ९ वा दीक्षांत समारंभ व शत्रुघ्न बाजड यांचा गौरव
प्रतिनिधी -सारंग महाजन
वैज्ञानिक आणि अभिनव संशोधन अकादमी (AcSIR) चा ९ वा दीक्षांत समारंभ २२ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी ९:३० वाजता डॉ. आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्र, नवी दिल्ली येथे संपन्न झाला. या समारंभाचे प्रमुख पाहुणे होते डॉ. जितेंद्र सिंह, मा,केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार), ज्यांनी आपल्या भाषणात AcSIR च्या कार्याची कौतुकास्पद माहिती दिली.यावेळी
डॉ. जितेंद्र सिंह म्हणाले, “AcSIR चे वय तरुण असू शकते, पण कर्तृत्व असामान्य आहे — आणि AcSIR हे याचे उज्ज्वल उदाहरण आहे. अल्पावधीतच AcSIR ने दाखवून दिले आहे की सक्षम वैज्ञानिक परिसंस्था असल्यास अत्यंत गुंतागुंतीचे आणि नवे संशोधन आपले तरुण संशोधक आत्मविश्वासाने पूर्ण करू शकतात. यासाठी फक्त योग्य मार्गाची आवश्यकता असते, आणि आज AcSIR भारतातील वैज्ञानिक प्रगतीसाठी तो मार्ग उपलब्ध करून देत आहे.”
त्यांनी पुढे सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली शैक्षणिक व संशोधन परिसर अभूतपूर्व प्रमाणात वाढला आहे—७,००० हून अधिक विद्यार्थी आणि ३,००० हून अधिक प्राध्यापक, CSIR, ICMR आणि इतर प्रमुख संस्थांमध्ये सहभागी आहेत. या विशाल नेटवर्कचा आधार घेऊन AcSIR राष्ट्रीय वैज्ञानिक चौकटीच्या केंद्रस्थानी उभा आहे आणि उच्च-गुणवत्तेच्या, उद्योग-संलग्न संशोधनाद्वारे देशाला सतत योगदान देत आहे.
AcSIR ने देशात प्रथमच i-PhD हा नवा अभ्यासक्रम सुरू केला असून, i-PhD मधील ‘i’ म्हणजे Industry तसेच Imagination आणि Innovation. कल्पना नवप्रवर्तनात रूपांतरित झाल्यावर उद्योग हा पुढील स्वाभाविक टप्पा ठरतो, आणि यामुळे अनेक तरुण संशोधक आपल्या कल्पना Start-up आणि संशोधनातून राष्ट्रीय संपत्तीमध्ये बदलू शकतात. डॉ. जितेंद्र सिंह यांनी सांगितले की, “भारत चौथ्या स्थानावरून जगातील पहिला विज्ञान व नवप्रवर्तन केंद्र बनण्याच्या दिशेने जात आहे आणि AcSIR सारख्या संस्था या परिवर्तनाचे नेतृत्व करतील. उद्याचा भारत तेजस्वी तरुणांच्या हातात असेल.”
या समारंभासाठी उपस्थित मान्यवर म्हणून डॉ. विनोद के. पॉल, सदस्य, नीती आयोग, भारत सरकार
डॉ. स्वाती अजय पिरामल, उपाध्यक्ष, पिरामल ग्रुप प्रो. एन. कलालसेल्वी, महासंचालक, CSIR आणि सचिव, DSIR
प्रो. पी. बलराम कुलपती, ACSIR
या समारंभात वाशिम जिल्ह्यातील वडजी गावचा सरपंच शत्रुघ्न मधुकर बाजड यांना पीएच.डी. पदवी प्रदान करण्यात आली. शत्रुघ्न बाजड हे वडजी येथील सामान्य शेतकरी कुटुंबातील सुपुत्र असून, त्यांनी प्राथमिक शिक्षण वडजी, माध्यमिक शिक्षण हिवरा आश्रम व लेहणी, तर उच्च माध्यमिक शिक्षण शिवाजी कॉलेज, चिखली आणि पुढील एम.एस्सी. (M.Sc.) मायक्रोबायोलॉजी पुणे येथे पूर्ण केले. त्यांनी CSIR-NET, MS-SET, आणि IIT-GATE परीक्षा यशस्वीरीत्या उत्तीर्ण करून भारत सरकारकडून शिष्यवृत्ती प्राप्त केली.
शत्रुघ्न बाजड यांनी CSIR-IICT, हैदराबाद येथून पीएच.डी. पूर्ण केली. त्यांनी “अर्षकुथार रस आणि एकांगवीर रस या आयुर्वेदिक औषधांचे प्रयोगात्मक प्राण्यांवर परिणाम” या विषयावर संशोधन केले, जे मिनिस्ट्री ऑफ आयुष (भारत सरकार) अंतर्गत पार पडले. या संशोधनातून आयुर्वेदिक औषधांचे वैज्ञानिक मूल्यमापन करून सुरक्षितता आणि परिणामकारकता सिद्ध करण्याचा प्रयत्न करण्यात आला.
सामाजिक क्षेत्रातही त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली वडजी गावाने खालील यश संपादन केले:
देशातील पहिले १००% प्रौढ BCG लसीकरण करणारे गाव
देशातील एकमेव गाव, जिथे Atmospheric Water Generation Unit झेडपी शाळेत बसवली गेली आई-वडिलांची सेवा नाही केली तर वारसा हक्क नाही’ असा सामाजिक नियम राबवला
पहिले पीएच.डी. धारक सरपंच असलेले गाव म्हणून वडजीचे नाव राज्यभर गाजले हेही तितकेच खरे आहे.
त्यांच्या प्रयत्नांमुळे वडजी गावाने विविध शेती व आरोग्य शिबिरे, जनजागृती मोहिमा आणि सरकारी योजनांचे यशस्वी अंमलबजावणीसाठी पुरस्कार मिळवले आहेत. शत्रुघ्न बाजड यांच्या या यशाबद्दल वडजी ग्रामस्थ, रिसोड तालुका व जिल्हाभरातून अभिनंदन होत आहे, आणि विज्ञान व समाजकार्य यांचा संगम साधणारे व्यक्तिमत्व म्हणून त्यांचे कौतुक केले जात आहे.









