जागतिक फार्मासिस्ट दिवस शास्त्री फार्मसी महाविद्यालयात विविध उपक्रमांनी साजरा
विशेष प्रतिनिधी .स्वप्निल पाटील.एरंडोल
शास्त्री फाउंडेशन संचलित शास्त्री इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, पळासदळ येथे २५ सप्टेंबर रोजी जागतिक फार्मासिस्ट दिवस मोठ्या उत्साहात व विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला.

आजच्या काळात आरोग्यसेवेवर प्रचंड दबाव आहे, बजेटमध्ये कपात होत आहे आणि आरोग्याच्या गरजा वाढत आहेत. अशा परिस्थितीत, आरोग्य कर्मचारी टिकवून ठेवणे हे एक मोठे आव्हान आहे. या आव्हानाला तोंड देण्यासाठी *फार्मासिस्टची महत्त्वपूर्ण भूमिका आहे*. फार्मासिस्ट फक्त औषधे देण्यापुरते मर्यादित नसून, आरोग्यसेवेचे एक महत्त्वाचे केंद्र बनले आहेत. ते लोकांना औषधांविषयी योग्य मार्गदर्शन करतात, रोगांचे व्यवस्थापन करण्यास मदत करतात आणि समाजाच्या आरोग्यासाठी आवश्यक सेवा देतात.जागतिक स्तरावर दरवर्षी २५ सप्टेंबर रोजी ‘फार्मासिस्ट दिवस’ साजरा केला जातो. २००९ पासून सुरू झालेल्या या परंपरेमागे उद्दिष्ट फार्मासिस्ट या आरोग्य क्षेत्रातील महत्त्वपूर्ण घटकाचे कार्य अधोरेखित करणे हे आहे. *१९१२ मध्ये स्थापन झालेल्या आंतरराष्ट्रीय फार्मास्युटिकल फेडरेशनच्या वर्धापन दिनानिमित्त हा दिवस साजरा केला जातो*.
कार्यक्रमाची सुरुवात सकाळी एरंडोल शहरातील तिरंगा चौकातून रॅली काढून झाली. ही रॅली आर.टी. काबरे हायस्कूल, मरीमाता चौक, बुधवार दरवाजा, अमळनेर दरवाजा मार्गे परत तिरंगा चौकात दाखल झाली. रॅलीदरम्यान महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी घोषणाबाजी करून नागरिकांना *फार्मासिस्टच्या कार्याबाबत जनजागृती केली*. तसेच पथनाट्य सादर करून औषधोपचारातील योग्य मार्गदर्शनाचे महत्त्व अधोरेखित केले.
या प्रसंगी एरंडोल मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष श्री. सतीश पाटील, माजी अध्यक्ष श्री. कैलास न्याती, तसेच मान्यवर श्री. मनोहर पाटील व श्री. भूषण पाटील विशेष उपस्थित होते. रॅलीच्या समारोपाच्या वेळी शहरातील सर्व कार्यरत फार्मासिस्टांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
तसेच महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली. या प्रसंगी *आंतरराष्ट्रीय कीर्तीचे प्रा. संजय लढे* यांनी “ *शैक्षणिक प्रगतीपुरता मर्यादित न राहता सर्वांगीण विकासावर भर द्या* ” असा मोलाचा संदेश विद्यार्थ्यांना दिला. त्यांनी फार्मसी शिक्षणातील संधी, करिअरचा वेध आणि जागतिक आरोग्य व्यवस्थेत विद्यार्थ्यांची भूमिका यावर मार्गदर्शन केले.
फार्मासिस्ट दिनानिमित्त महाविद्यालयाने समाजाशी नाळ जुळवण्याच्या हेतूने *पळासदळ गावात मोफत रक्तगट तपासणी शिबिर आयोजित केले*. गावकऱ्यांनी या शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला.
कार्यक्रमाचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य व *संस्थापक अध्यक्ष डॉ. विजय शास्त्री, सचिव सौ. रूपा शास्त्री, तसेच उपप्राचार्य डॉ. पराग कुलकर्णी यांच्या हस्ते झाले*. अध्यक्षीय भाषणात डॉ. शास्त्री म्हणाले, *“फार्मासिस्ट हा डॉक्टर आणि रुग्ण यांच्यामधील महत्त्वाचा दुवा असून, तो औषधोपचारामध्ये मार्गदर्शकाची भूमिका बजावतो. आरोग्य व्यवस्थेत फार्मासिस्टचे योगदान अनन्यसाधारण आहे*.” त्याच अनुषंगाने शास्त्री फार्मसी महाविद्यालयात दिवसभर विविध उपक्रम राबवून सामाजिक जाणीव व शैक्षणिक दृष्टिकोनातून कार्यक्रम यशस्वी करण्यात आला.
सदर कार्यक्रमाचे नियोजन डॉ. पराग कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. प्रा. अनुप कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले, तर प्रा. जावेद शेख यांनी आभारप्रदर्शन केले.तसेच विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांच्या समन्वयातून हा उपक्रम यशस्वीरीत्या संपन्न झाला.










