कामठी तालुक्यातील शासकीय निवासी शाळा डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय प्राविण्य पुरस्काराने सन्मानित
प्रतिनिधी सतीश कडू
नागपूर,दि. 13 : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत असलेल्या कामठी तालुक्यातील वारेगावच्या अनुसूचित जाती व नवबौध्द मुलांची शासकीय निवासी शाळेला डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय प्राविण्य पुरस्काराने नुकतेच सन्मानित करण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट, राज्यमंत्री श्रीमती माधुरी मिसाळ, प्रधान सचिव हर्षदीप कांबळे, समाज कल्याण आयुक्त प्रविण पुरी यांच्या उपस्थितीत यशवंतराव चव्हाण सभागृह, मुंबई येथे हा पुरस्कार वितरीत करण्यात आला. हा पुरस्कार प्रादेशिक उपायुक्त डॉ.सिद्धार्थ गायकवाड, सहाय्यक आयुक्त सुकेशिनी तेलगोटे, मुख्याध्यापक विलास गायकवाड व शुभांगी खापेकर यांनी स्वीकारला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मार्गदर्शनात सदर शाळेमध्ये अनेक सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या. याचबरोबर जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी शाळेला प्रत्यक्ष भेट देऊन वेळोवेळी मार्गदर्शन केले. या शाळेत उपलब्ध सोयी-सुविधांमध्ये खगोलशास्त्र, गणित, भाषा, रोबोटिक,र्व्हच्युअल, संगीत, संगणक व विज्ञान प्रयोगशाळा, ई-ग्रथांलय, सायन्स पार्क, साहस पार्क, खुली जीम, प्रशस्त क्रीडांगण आदी सुविधा उपलब्ध करुन दिल्या आहेत. शाळेची भव्य व प्रशस्त इमारत असून विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके, शैक्षणिक साहित्य, गणवेश, ट्रॅकसूट , सर्व सुविधांयुक्त निवास व्यवस्था, समतोल आहार, मॉड्युलर किचन, पिण्यासाठी निर्जंतुक पाण्याची व्यवस्था, चिलर वाटर प्युरीफायर (RO), गिझर, बोलक्या भिंती या सुविधांमुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होत आहे. सायन्स व ॲडव्हेंचर पार्क असलेली ही राज्यातील प्रथम शाळा म्हणून ओळखली जाते.
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अभ्यासासोबतच शिस्त, स्वच्छता, आरोग्यदायी सवयी सांस्कृतिक कार्यक्रम यांचे अतिशय चांगल्या प्रकारे नियोजन करून उपक्रम राबविले जातात. येथे 200 विद्यार्थी प्रवेशित आहेत.
मागील 5 वर्षापासुन शाळेचा S.S.C. बोर्डाचा निकाल 100% असून विद्यार्थी गुणवत्ता यादीमध्ये स्थान प्राप्त करीत आहेत. शाळेच्या यशासाठी दिवसरात्र धडपडणाऱ्या सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या सामुहिक सहकार्यातून ही निवासी शाळा उत्तरोत्तर यशाची नवी शिखरे पादाक्रांत करीत आहेत.
